Home चंद्रपूर भावनिक प्रज्ञेमुळेच समाज सुदृढ बनतो : डॉ. भूषणकुमार उपाध्याय

भावनिक प्रज्ञेमुळेच समाज सुदृढ बनतो : डॉ. भूषणकुमार उपाध्याय

26

▪️आरसीईआरटीमध्ये भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22मे):-सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय (RCERT), चंद्रपूर येथे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी विद्यार्थ्यांना भावनिक प्रज्ञा, भारतीय संस्कृती, आत्मचिंतन आणि सकारात्मक जीवनमूल्यांवर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि मान्यवर भारावून गेले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूरचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त डीवायएसपी चंद्रकांत उदगीकर, संस्थेचे कोषाध्यक्ष निनाद गड्डमवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे तसेच सामाजिक कार्यकर्ते व्ही. डी. मेश्राम उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले की, “जगातील प्रत्येक सजीवामध्ये भावना असतात. आई माणसाची असो, हत्तीची असो किंवा सिंहाची — आपल्या पिल्लांप्रती प्रेम, माया आणि संरक्षणाची भावना प्रत्येकामध्ये असते. मात्र माणसाला देवाने बुद्धीची विशेष देणगी दिली आहे. त्यामुळेच माणूस विचार करू शकतो, योग्य-अयोग्य यातील फरक ओळखू शकतो आणि विवेकाने निर्णय घेऊ शकतो.”

ते पुढे म्हणाले की, माणसाच्या जीवनात भावना आधी कार्य करतात आणि नंतर विचार. त्यामुळे आपल्या भावनांना समजून घेणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात माणूस स्वतःपासून दूर जात आहे. गावाची ओढ, बालपणातील संस्कार, नाती आणि संवेदनशीलता आता हळूहळू कमी होत चालली आहे. भारतीय संस्कृतीने मात्र नेहमीच संयम, संवाद, सहअस्तित्व आणि माणुसकी शिकवली आहे. त्यामुळे आधुनिकतेसोबत संस्कार आणि संवेदनशीलता जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. उपाध्याय यांनी Emotional Intelligence अर्थात भावनिक प्रज्ञा या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करत सांगितले की, केवळ IQ नव्हे तर EQ माणसाला खऱ्या अर्थाने यशस्वी आणि आनंदी बनवते. “जो माणूस स्वतःच्या भावना समजतो, तोच दुसऱ्यांच्या भावना समजू शकतो. आणि जो दुसऱ्यांना समजून घेतो, तोच खऱ्या अर्थाने मोठा माणूस बनतो,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी Neuroplasticity या संकल्पनेवरही सविस्तर भाष्य केले. माणूस स्वतःमध्ये बदल घडवू शकतो, चांगल्या सवयी अंगीकारू शकतो आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित करू शकतो, असे सांगताना त्यांनी वाल्मिकी ऋषींचे उदाहरण दिले. सातत्याने केलेल्या कृतींमुळे मेंदूमध्ये नवीन नेटवर्क तयार होतात आणि त्यातून सकारात्मक सवयी निर्माण होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस दलातही आता भावनिक प्रज्ञेवर प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगत त्यांनी तणावपूर्ण परिस्थितीत संयम आणि शांतता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. योग, आत्मचिंतन आणि सकारात्मक विचार यामुळे व्यक्ती, परिवार आणि समाज अधिक सुसंस्कृत व संवेदनशील बनतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी एक भावस्पर्शी शायरी सादर करत उपस्थितांची मने जिंकली —

“लोग बोलते रहे और मैं चुप रहा,

अगर मैं भी बोल पड़ा होता,

तो ना जाने क्या होता…”

या ओळींमधून त्यांनी संयम, शांतता आणि विचारपूर्वक वागण्याचा संदेश दिला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात विनोद दत्तात्रेय यांनी आजच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही सक्षम होणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजामध्ये सकारात्मक विचार, संस्कार आणि संवेदनशीलता वाढविण्यासाठी अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात विद्यार्थ्यांना योग्य दिशा, सकारात्मक विचार आणि भावनिक संतुलनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळून सुदृढ समाज निर्मितीसाठी मोठी मदत होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. देवश्री कोडगीरे यांनी केले. त्यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला.

यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात विशेषतः सामाजिक कार्यकर्ते व्ही. डी. मेश्राम, ॲड. दत्ता हजारे, डॉ. सुशील मुंधडा, घनश्याम मुलचंदानी, विनायक बागडे, सुभाषसिंग गौर, दीपक जयस्वाल, अशोक नागपुरे , पप्पू देशमुख, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आयोजित या प्रेरणादायी व्याख्यानाने उपस्थितांना भावनिक प्रज्ञेचे महत्त्व नव्याने पटवून दिले तसेच सकारात्मक, सुसंस्कृत आणि संवेदनशील समाज निर्मितीचा प्रभावी संदेश दिला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाचे संयोजक प्रो. अमित आक्केवार , प्रो. पराग धनकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांन परिश्रम घेतले.