Home महाराष्ट्र भारतावरील इंधन संकट हे जागतिक स्तरावरील संकट नसून मोदी निर्मीत संकट आहे!…..कसे?

भारतावरील इंधन संकट हे जागतिक स्तरावरील संकट नसून मोदी निर्मीत संकट आहे!…..कसे?

16

▪️ज्येष्ठ पत्रकार तुषार गायकवाड यांचे मनोगत !!

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

अदानी प्रकरणाची चौकशी व एपस्टीन फाईल्स मधील मोदी मित्रांचे उघड झालेले संबंध यामुळे मोदीजी भारताचे पारंपारीक अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण सोडून अमेरिका इस्त्रायलच्या तालावर नाचत आहेत. त्यामुळे रशिया आणि इराणशी संबंध खराब झाले. परिणामी देशावर इंधन संकट ओढावले आहे.

सोने खरेदी बंद करा, परदेश दौरे बंद करा, खाद्यतेल कमी वापरा. यांसह इंधन बचतीचा संदेश देवून मोदी स्वतः परदेशवारी करण्यासाठी चालले आहेत. सगळे भाजपा नेते मोदींची उधळपट्टी लपवण्यासाठी इंधन बचतीची फोटोभक्ती सार्वजनिक करण्यात व्यस्त आहेत.

मात्र वास्तव काय आहे?

भारताची आजरोजीची अंदाजे लोकसंख्या सुमारे १४७ कोटींच्या आसपास आहे. यापैकी ८१ कोटी जनतेला रेशनिंग वरती अन्नधान्य देवून जगविण्याचे काम केंद्र सरकार करते, अशी माहिती लोकसभेच्या रेकॉर्ड वर नोंद करत केंद्र सरकारने २०२६ च्या सुरुवातीलाच दिली आहे.

भारताच्या एकूण लोकसंख्येतून ८१ कोटी रेशन लाभार्थी वजा केल्यास उरतात फक्त ६६ कोटी लोक. यापैकी १६ कोटी लोक देशांतर्गत विमान प्रवास करतात. तर सुमारे ५ कोटी लोक नियमित परदेशी प्रवास करतात. राज्यकर्ते स्वतःच्या पैशाने परदेश दौरे करत नाहीत. त्याचप्रमाणे सुमारे ३० कोटी लोक वर्षभरात विविध प्रसंगी सोने खरेदी करतात. 

म्हणजे ५ कोटी परदेशी विमान प्रवास करणारे लोक आणि ३० कोटी सोने खरेदी करणारे लोक, ज्यामधे सत्ताधारी पक्षांशी संबंधित टक्केवारी अधिक आहे. यांच्यासाठी ८१ कोटी गरीब लोकसंख्येला सिलेंडरच्या रांगेत उभे केले आहे?

अदानीला वाचवण्यासाठी संपूर्ण देशाने त्रास सहन करायचा आहे? 

यापेक्षा भयंकर म्हणजे ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय ध्वजधारी मालवाहू जहाज ‘एमएसव्ही हाजी अली’वर ड्रोन हल्ल्या झाल्याने या जहाजास जलसमाधी मिळाली आहे. सुदैवाने १४ भारतीय कर्मचाऱ्यांना ओमानच्या तटरक्षक दलाने सुखरूप वाचवले.आणखी एक जहाज इराणच्या ताब्यात गेले आहे.

अशावेळी आंतरराष्ट्रीय कुटनीती दाखविण्याऐवजी आंतरिक राजकीय नाट्य आणि प्रतीकात्मक कृतींनी राष्ट्रहित साधले जात नाही. केंद्र सरकारकडे याबाबतीत कसलेही ठोस धोरण नाही. हे अधिक चिंताजनक आहे.

अदानीला वाचवणारे परराष्ट्र धोरण आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारे राज्यकर्ते व ३५ कोटी लोकांचे चोचले पुरवण्यासाठी ११२ कोटी जनतेला वेठीस धरणे ही राष्ट्रभक्ती कशी? ज्यापैकी ८१ कोटी जनता रेशनिंग वर जगते! असे दस्तुरखुद्द केंद्र सरकारच रेकॉर्डवर सांगतेय.

काही दिवसांनी भिक मागणे हेदेखील राष्ट्रभक्तीच आहे अशी राष्ट्रभक्तीची १४४ वी व्याख्या देशाला देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. 

अशावेळी इथला गोदी मेडीया, सोशल मेडीयातले बहुसंख्य वापरकर्ते आणि राज्यकर्ते फोटोभक्तीमध्ये तल्लीन आहेत. विरोधी पक्षनेता प्रवास कोणाच्या पैशाने करतो? म्हणून प्रश्न विचारत आहेत. याचा अर्थ देशाचे गृह खाते पाकिस्तानी किंवा बांगलादेशी चालवत आहेत असा होतो हेदेखील या माठांना समजत नाही? इतके सुमार लोक आपला देश चालवत आहेत?? 

सपशेल फसलेलं परराष्ट्र धोरण, देशाच्या अर्थव्यवस्थेची लावलेली वाट, भ्रष्टाचाराने पोखरून काढलेले इन्फ्रास्ट्रक्चर आणि हाताबाहेर जात असलेला जनतेतील असंतोष. यावर फोटोभक्ती हा खुळखुळा उपाय किती काळ टिकणार? याचा विचार झळ बसणाऱ्या भारतीयांनी करायला हवा.