

“तुम अपुनको दस, दस मारा. मगर अपून तुमको सिर्फ एक मारा पन साॅलिड मारा ना!”
विक्रोळी म्हटलं की, सर्वप्रथम आठवतं ते फक्त विक्रोळीचाच नव्हे तर समग्र आंबेडकरी चळवळीचा राजा. याच विक्रोळीत राहतो म्हणजे खरं सांगायचं तर राहत होते. कारण आज ते हयात नाहीत. त्या राजाचं नाव आहे, “राजाभाऊ ढाले”. दुसरं नाव घ्यायचं ते आंबेडकरी काव्यक्षेत्रात दादागीरी करणारा दादा स्मृतीशेष धुरंधर मिठबावकर. पाच, पाच कवितासंग्रह आज बर्याच कवींच्या नावावर असताना धुरंधरचा एकच कवितासंग्रह होता. त्याचं नाव ‘नागपुत्राच्या कविता!’ होय. हा एकच कवितासंग्रह असतानाही भले, भले नामचीन कवी धुरंधरला दबून असायचे. कारण धुरंधरचा हा कवितासंग्रहच जबराट आहे. अशावेळेस मला ‘अमर अकबर अँथेनी’ चित्रपटातला अमिताभचा डायलाॅग आठवतो. अमिताभ बच्चन विनोद खन्नाला म्हणतो, “तुम अपुनको दस, दस मारा. मगर अपून तुमको सिर्फ एक मारा पन साॅलिड मारा ना!” धुरंधर आणि त्याचा हा एकुलता एक कवितासंग्रह, हे दोन्ही साॅलिडच आहेत. त्यानंतर आठवतात ते स्मृतीशेष खासदार एकनाथराव गायकवाड. एकनाथराव सुध्दा विक्रोळीत रहायचे.
साहित्याची आवड आणि जाणिव असलेला अत्यंत चोखंदळ रसिक माणूस. त्यांनी व जेष्ठ साहित्यिक व कथाकथनकार वामनराव ओव्हाळ यांनी चालवलेली कबीर व्याख्यानमाला म्हणजे विक्रोळीचं अत्यंत महत्त्वपूर्ण संचित होतं. आता ती व्याख्यानमालाही नाही, वामनरावही नाहीत आणि एकनाथरावही नाहीत. याच विक्रोळीत आणखीन एक मोठ्ठा कवी रहायचा. त्याचं नाव अरुण म्हात्रे. आता तो वांगणीच्याही पुढे राहायला गेलाय. त्याच्या अनेक कविता आजही आठवतात. “छातीत फुले फुलण्याची, वाऱ्यावर मने झुलण्याची॥ ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे॥” आणि खरोखरच ती वेळ निराळीच होती आणि आजचीही वेळ निराळीच आहे. याच विक्रोळीत एका कवि संमेलनात नवाकाळचे सुरेश नगर्सेकर प्रमुख पाहुणे असताना मी नवाकाळचे तीन, तेरा करणारी कविता वाचली होती. आणि मग नगर्सेकरांनी जो थयथयाट केला होता तोही आठवला.
याच विक्रोळीत लोकशाहीर विठ्ठल उमप रहायचे. विठ्ठल दादांच्या नावाने आज विक्रोळीत एक सांस्कृतिक भवन उभं आहे. याच भवनात विठ्ठल दादांच्या मुलाने म्हणजेच संदेशने गेल्या वर्षी आमच्या उठावचं कवि संमेलन ठेवलं होतं. आमच्या लहानपणी प्रत्येक लग्नात आम्ही एका गाण्यावर भन्नाट नाचायचो. ते गाणं म्हणजे, “तुझा खर्च लागला वाढू, सांग कितीदा कर्ज काढू?” थोडा मोठा झाल्यावर कळलं की, या गाण्याचे कवी कुंदन कांबळे असून ते सुध्दा विक्रोळीतच राहतात. “वैर जिंकावे प्रेमाने, युध्दाने वाढते युध्द॥ शाक्य कोलीय संघर्षात वदले गौतम बुद्ध॥” यासारख्या अनेक लोकप्रिय गाणी लिहणा-या या थोर गीतकारासोबत आम्हाला कविसंमेलन करण्याचा अनेक वेळा सुवर्ण योग आला. मुळात कुंदन कांबळे हे उठावचे संस्थापक कवी होते आणि शनिवारी (7 जून) ते जिथे राहत होते तिथेच उठावचा कार्यक्रम होणार आहे.
याच विक्रोळीत प्रेमानंद गज्वी सारखे दिग्गज नाट्यलेखकही राहतात. आमचा रमेश भवारही याच विक्रोळीत रहायचा. आता तो नाशिकला राहतो. याच विक्रोळीत संजय सावंत, अशोक निकाळजे, गौतम सांगळे, प्रवीण यादव, विष्णू भंडारे यासारखे आंबेडकरी चळवळीतील अत्यंत सजग असणारे असंख्य मित्र राहतात. एका अर्थाने विक्रोळी म्हणजे आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचा एक सशक्त बालेकिल्लाच आहे. खरं तर विक्रोळीबाबत सांगण्यासारखं बरंच काही खुप, खुप सांगता येईल. या छोट्याशा लेखात आणखीन बर्याच जणांचा उल्लेख करायचा राहून गेलाय, याचीही मला जाणीव आहे. पण ते आपण सर्व समजून घ्याल ही खात्री आहे. तर अशा या विक्रोळी नामे सांस्कृतिक नगरीत शनिवारी ७ जूनला उठावचा कार्यक्रम होतो आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमाला यावे, असे आवाहन विक्रोळीकरांना करण्याची आम्हाला अजिबात गरज वाटत नाही. विक्रोळीकर आवर्जून या कार्यक्रमात सहभागी होतील ही खात्री बाळगून येथे थांबतो. जयभीम!
✒️विवेक मोरे(अध्यक्ष,उठाव साहित्य मंच)मो:-8451932410







