Home चंद्रपूर आषाढी पौर्णिमेचं ऐतिहासिक महत्व

आषाढी पौर्णिमेचं ऐतिहासिक महत्व

179

पौर्णिमा म्हणजे प्रत्येक महिण्याच्या मध्यावर असणारा पंधरावा दिवस होय. या दिवशी सुर्य व चंद्र यांच्या प्रकाशचा लाभ सतत 24 तास पृथ्वीवरील सजीव प्राणीमात्रांना मिळतो. सूर्याचा प्रखर व स्वच्छ प्रकाश, चंद्राचा शीतल व आल्हाददायक प्रकाश यामुळे या दिवशी पृथ्वीवर एक प्रकारचे उत्साही, आनंदी व उत्तेजनशील वातावरण पसरलेले असते निसर्गाच्या सनिघ्यात अशा पौर्णिमेच्या दिवशी जीवन कसे उबदार व शक्तिवर्धक वाटते.

         आषाढी पौर्णिमेच्‍या पवित्र दिवसाला गर्भमंगळ दिन, महाभिनिष्क्रमण दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास प्रारंभ दिन अशा अर्थपूर्ण विविध नावानी संबोधिले जाते. या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी तथागत गौतम बुध्दाच्या जीवनकालक्रमात फार मोठया संस्मर्णीय घटना घडल्या आहेत. आषाढी एकादशीला बुध्दांनी धम्मचक्र गतिमान केले, म्हणून या दिवशी त्याकाळी लोक विहारात जाऊन प्रवचनाचा लाभ घेत होते. त्या प्रथेचे स्वरुप बदलले असते तरी आजही लोक आषाढी पौर्णिमेला वाऱ्या काढतांना दिसत आहेत. या वाऱ्यांचे आणि पालख्या निघत असल्याचे बीज धम्मचक्र प्रवर्तन दिनातून निघाले आहे.

         कपिलवस्तूची महाराणी महामाया मातेच्या उदरी गर्भधारणा झाल्याची जाणीव निश्चीत झाली म्हणून या पौर्णिमेच्या दिवसाला गर्भमंगळ संबोधिल्या जाते. त्यानंतर बरोबर एकोणतीस वर्षांनी राजपुत्र गौतम यांनी आपल्या सुखमय वैभवाचा, स्वत:च्या पत्नीपुत्राचा, माता-पित्याचा, धनसंपत्तीचा केवळ जगातील मानवाच्या दु:खमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी, सत्याचे संशोधन करण्याच्या उद्देशाने प्रभावित होऊन या आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गृहत्याग केला. म्हणून या पौर्णिमेला ‘महाभिनिष्क्रमण दिन’ असे संबोधिले जाते. गृहत्याग केल्यानंतर अथक परिश्रमाने स्वदेहास क्लेश देऊन सतत सहा वर्षाच्या घोर तपश्चर्येनंतर बोधीसत्व सिध्दार्थास बुध्दत्व प्राप्त झाले ते प्रज्ञावंत महामानव झाले.

         सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर ज्ञानप्राप्तीच्या आनंदाचा अनुभव घेत घेत त्यांनी सतत तब्बल सात आठवडे पायी प्रवास केला. प्रवास करीत असतांनाच या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सारनाथ येथे पंचवर्गीय ब्राम्हण भिक्खूंना (कौडिण्य, अश्वजित, महानाम, कश्यप, भद्रीक) त्यांनी आपण स्वत: अनुभवलेल्‍या सत्यशोधनाचा उपदेश कथन केला. त्यांनी कथन केलेल्या सत्यशोधन ऐकूण हे पाचही ब्राम्हण भिक्षू प्रभावित झाले. ती या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी करिता या पौर्णिमेस ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ असे संबोधिले जाते. याचप्रमाणे या आषाढ पौर्णिमेचे दुसरे एक महत्व मानले जाते, ते म्हणजे पंचवर्गीय भिक्खूसंघासोबत तथागत गौतम बुध्दांनी सारनाथ येथील ऋषिपतन हरणाच्या बागेत वर्षावास प्रारंभ केला म्हणून या पौर्णिमेस ‘वर्षावास प्रारंभ दिन’ म्हणूनही संबोधण्यात येते. बुध्दांनी आपल्‍या ‘एकसष्ठ भिक्षूंचा संघ’ आषाढी पौर्णिमेला स्थापन केला. जगातील सर्वात पहिल्या भिक्खू संघाची स्थापना ज्या दिवशी झाली तो दिवस आषाढी पौर्णिमा होता.

       वर्षावास म्हणजे नेमके काय? याचे स्पष्टीकरण करावयाचे झाल्‍यास वर्षावास म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीस वर्षावास म्हणतात. या वर्षावासाच्या कालावधीत भिक्खूगण सामुदायिकरित्या ठरविलेल्‍या एकाच ठिकाणी वास्तव्य करतात. ही परंपरा तथागतांनीच सुरु केलेली आहे. त्यांनी 45 वर्षावास भिक्खूसंघा समवेत वास्तव्य केलेले आहे आणि तीच परंपरा आजतागायत अखंडपणे प्रत्येक विहारात सुरु असते, आहे. ज्याठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. त्‍या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील बौध्द उपासक-उपासिकांना भगवान बुध्दाच्या पवित्र धम्माच्या शिकवणूकीचा उपदेश आपल्या धम्मप्रवचनातून करतात. धम्म आचरणात कसा आणावं, धम्म शिकवणूकीचे काटेकोरपणे पालन आपल्‍या दैनंदिन व्यवहारामध्ये कसे अमलात आवावे की जेणेकरुन माणसाचे अज्ञान, अविज्ञा नाहीसे होऊन तो माणूस सुज्ञ सुसंस्कृत होईल. या वर्षावासाच्या कालावधीत ते बुध्द-धम्म-संघ या त्रिरत्नांची उद्बबोधक माहिती सांगितली जाते. त्याचप्रमाणे उपासक-उपासिकांना बुध्द पूजा-वंदना-सुत्तपठण याचे आपला जीवनाशी निगडित असलेले महत्व हे देखील आपला धम्मप्रवचनाद्वारे भिक्षू कथन करतात. त्यामुळ उपासक-उपासिकांची आत्मशुध्दी होते कारण उपसाही केला जातो

         वर्षावासाचा कालावधी संपल्यानंतर श्रध्दाभावनेने, निष्ठेने सामुदायिकरित्या हा महोत्सव साजरा केला जातेा. अशा तऱ्हेने या वर्षावास सोहळयाचा समारोप केला जातो. त्यानंतर एकत्रित वास्तव्य करीत असलेले सर्व भिक्खूगण धम्म प्रचारार्थ-प्रसारार्थ वेगवेगळया दिशेने वेगवेगळया ठिकाणी जातात. अशा प्रकारे आषाढ पौर्णिमेचे जगात अनन्यसाधारण महत्व आहे.

        उपासक-उपासिकांमध्ये बंधुत्वाची, समतेची, मैत्रीची, करुणेची भावना निर्माण व्हावी हीच वर्षावासानिमीत्त मंगलकामना, शुभेच्छा !

✒️प्रभाकर सोमकुवर(नागपूर)मो:-9595255952