

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.23ऑक्टोबर):- लक्ष्मी पुजन म्हणजे आपल्या घरच्या धन संपत्ती वैभवाचं पुजन नसून आपल्या घरातील महिलेचा सन्मान करणे हेच खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन असून ज्या घरात स्त्रीचा सन्मान असेल त्याच घरी सुख समाधान नांदत असते. कितीही संपत्ती असेल परंतु ज्या घरात स्त्री सन्मान नसेल त्या घरी सुख समाधान कदापी नसते घरची स्त्री हिच खरी लक्ष्मी असते हा संदेश मराठा सेवा संघाने शिवधर्माच्या माध्यमातून समाजात रुजवला असून मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते दिवाळीच्या सणाला आपल्या घरी पत्नीचे पुजन करून गृहलक्ष्मी पुजनाचा समाजात नवा आदर्श निर्माण करत आहे.
वैदिक संस्कृती ही पुरुषसत्ताक संस्कृती आहे.ती ऋषी संस्कृती असून विश्वाची जननी असलेल्या स्त्रीला शुद्र मानणारी असल्याने आपण ती सातत्याने नाकारत असतो.तर सिंधू संस्कृती ही मुळची मातृसत्ताक सिंधु बळी शिवसंस्कृती आहे.ती कृषी संस्कृती असल्याने चळवळीत काम करणारे आपण सकळ बंधू भगिनी थेट अनार्य अशा सिंधू संस्कृतीशी आपले नाते सांगत असतो.तर दुसऱ्या बाजूने परकीय आर्यांच्या वैदिक संस्कृतीला नाकारत असतो.
नकार हा केवळ वाणीतून प्रकट न होता.तो आपल्या करणीतून सुद्धा प्रकट व्हायला हवा.एखाद्या व्यक्तीला,समुहाला,रुढीला, परंपरेला,पायंड्याला,संस्काराला व संस्कृतीला नाकारताना त्यावर केवळ शब्दांचे फटकारे ओढून चालत नाहीत.तर त्या व्यक्तीला, समुहाला, रुढीला,परंपरेला, पायंड्याला, संस्काराला व संस्कृतीला कालोचीत,तर्कशुद्ध, बुद्धीप्रामाण्यवादी व विज्ञानाधिष्ठीत विकल्प देणे सुज्ञपणाचे ठरते.अशा सुज्ञपणाने अनेक अतार्कीक व कालबाह्य परंपरांना हद्दपार करता येते.याची प्रचिती मराठा सेवा संघाच्या मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड… व इतर तेहत्तीस कक्षात काम करणाऱ्या चळवळीतील देशभरातील कार्यकर्त्यांच्या या अभिनव उपक्रमातून समाजाला नवी दिशा मिळत असल्याचा प्रत्यय येत आहे.
. पत्नी ही आपली पूर्णांगिनी,जीवनसाथी असते.लग्ना नंतर पत्नी सदैव आपल्या पतीसह आपल्या सासरच्या सर्वांची जबाबदारी घेते.सर्वांची काळजी घेते.कुटूंबातील विविध फुलांना एकाच माळेत ओवणारा धागा बनते.पत्नी कुटूंबातील सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होते.म्हणूनच तिच्या त्यागाचा,समर्पणाचा व सेवेचा यथोचित सन्मान व्हायला हवा.कुठेतरी पत्नीच्या पाठीवर शाबासकीची थाप पडायला हवी.
आपले परिजन आपल्या कामगिरीचे मुल्यांकन करुन आपल्यालाशी आत्मीयतेने, जिव्हाळ्याने व वात्सल्याने जुळलेले आहेत.हा एक ठोस संदेश आपल्या पत्नीच्या मन-मस्तकावर बिंबवला जावा आणि कुटूंबाच्या सर्व फुलांना एका सुंदर व सुगंधीत पुष्पमालेत परावर्तीत करणारा धागा अधिकाधिक मजबूत व्हावा.शिवाय दिवाळसनात कोणत्या गुढ,अनभिज्ञ व मातीच्या लक्ष्मीचे पूजन करण्याऐवजी आपल्याच परिवारातील खऱ्याखुऱ्या लक्ष्मीचे पूजन व्हायला पाहिजे.हा कालसुसंगत व पुरोगामी विचार परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी मागील अनेक वर्षांपासून अंगीकारला आहे.विशेष म्हणजे दरवर्षी गृहलक्ष्मीचे पूजन करणारांची संख्या वाढत आहे,ही फारच आनंदाची बाब आहे.
समाजातील अनिष्ट,काल विसंगत अशा रुढी,परंपरा व प्रथा हद्दपार करायच्या असतील तर प्रत्येक कुटूंबास हितकारक अशी कालोचित, बुद्धीप्रामाण्यवादी व विज्ञानवादी परंपरा समाजात प्रस्थापित करण्यासाठी युवकांना आता पुढे आले पाहिजे.हाच आमचा गृहलक्ष्मी पूजना मगील एकमात्र उद्देश आहे. असल्याचे रामचंद्र सालेकर, पंडित देशमुख, गणेश नाना शिंदे, गोपाळ खडसे,अजय सोनूनकर आदी कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देतांना मत व्यक्त केले.







