

▪️दिवाळीत हायवे वर धनदांडग्या युवकांनी मस्ती करणे भोवले
✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.23ऑक्टोबर):*राजुरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील कापनगाव महामार्गावर दिनांक २१ आक्टोंंबर २०२५ रोजी रात्री ९-३० वाजताच्या दरम्यान पांढरपौनी येथील आर्यन कोल वाॅशरिज येथे दुचाकीने कर्तव्यावर जातांना नुतेश लिलाधर सातपुते या युवकाला चुकीच्या दिशेने येणा-या कारने जोरदार धडक दिली आणि या मोटरसायकल स्वाराला सुमारे ५० फुट घासत नेले. या दुर्घटनेत नुतेन लिलाधर सातपुते, वय ४५, राहणार रमाबाई वार्ड, राजुरा हे जागीच ठार झाले. यावेळी रस्याने जाणा-या अन्य वाहनचालकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि नुतेश सातपुते यांना घेऊन राजुरा उपजिल्हा रूग्णालयात आणले. वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आरोपीला पोलिसांनी अद्याप अटक केली नाही.
प्राप्त माहितीनुसार नुतेश लिलाधर सातपूते हे पांढरपौनी येथील आर्यन वाॅशरिज या कंपनी नौकरी करतात. रात्र पाळीत डुटी असल्याने रात्री ९-३० वाजता नुतेश घरून मोटरसायकल ने निघाले. ते राजुरा – गडचांदूर महामार्गावरील कापनगाव जवळील नविन पूलाखाली आले असता चुकीच्या दिशेने वेगात येणा-या कार क्रमांक एमएच ३४ / बी.व्ही. ४७६२ ने मोटरसायकल ला जोरदार धडक दिली. ही सात आसन व्यवस्था असलेली कार अशुल राजेश उपगन्लावार, वय २० हा चालवित होता. प्राप्त माहितीनुसार अशुल राजेश उपगन्लावार हा आपल्या मित्रांसह कारने या नविन महामार्गावर मौजमजा करीत आणि कारमधून दिवाळीतील फटाके व बाण सोडण्याचा आनंद घेत या भागात कारने वेगाने फिरत होता. या परिसरात नविन महामार्ग झाल्याने रस्ते चांगले असून या भागात तिन चक्कर मारल्यानंतर चौथ्या वेळेस चुकीच्या दिशेने घेत कारने आपल्या रस्त्याने येणा-या मोटरसायकल ला जोरदार धडक दिली. दिवाळीचा आनंद साजरा करणा-या धनदांडग्यांच्या या मुलानी गरीब कुटूंब प्रमुखाला चिरडले आणि त्यांना ऐन दिवाळीत शोक करण्याची परिस्थिती आणून ठेवली.
घटना घडताच रमाबाई नगर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी शवविच्छेदन करण्यापूर्वी कठोर कारवाई करावी आणि नुकसानभरपाई ची मागणी करीत वार्डातील नागरिकांनी राजुरा उपजिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी केली. माजी नगराध्यक्ष अरूण धोटे आणि माजी नगरसेवक हरजितसिंगसिंग संधू यांनी नागरिकांना शांत केले.
या प्रकरणी राजुरा पोलिसांनी आरोपी अशुल राजेश उपगन्लावार, वय २० यांचेविरुद्ध घाईघाईत व लापरवाहीने वाहन चालविल्याबद्दल अपराध क्रमांक ५१० / २०२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध व्हीएनएस कलम २८१, १०६ (१) आणि कलम १८४ (४), १२२ मोटर वाहन कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राजुरा ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात उप पोलिस निरीक्षक भिमराज सोरते अधिक तपास करीत आहेत.







