

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006
सध्या सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांनी भाजपसमोर नांग्या टाकत कमळीची वाट धरली आहे. जिल्ह्यातले अनेक नेते भाजपात जात आहेत. आपली मुळची परंपरा, विचारधारा आणि वारसा गुंडाळून अनेकांनी भाजपाची वाट धरली आहे. ज्या जिल्ह्याने नेहमीच पुरोगामी विचारधारा जपली. पुरोगामी विचार वाढवला व जोपासला त्याच जिल्ह्यातले अनेक नेते कमळाबाईच्या बाहूपाशात विसावू लागले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी जी. डी बापू लाड, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री व क्रांतिकारक वसंतराव दादा पाटील यांचा हा जिल्हा. या जिल्ह्याचा राज्याच्या राजकारणावर अनेक वर्षे प्रभाव राहिला. गेली दहा-अकरा वर्षे वगळता सातत्याने राज्याच्या मंत्रीमंडळात सांगलीचा वरचष्मा राहिला आहे. इथल्या लोकांनी पुरोगामी विचार नेहमीच जोपासला. गांधी, नेहरूंचा मार्गच या लोकांनी प्रशस्त केला. आज त्याच सांगली जिल्ह्यातले अनेकजण “संघम शरणम् गच्छामी” म्हणत भाजपात जात आहेत. परवा क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांचे नातू व राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार अरूण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनीही भाजपाची वाट धरल्याची धक्कादायक बातमी समजली. गेल्या पाच दहा वर्षात अनेकांनी भाजपाची वाट धरली पण फारसं काही वाटलं नाही. पण जी. डी. बापूंच्या नातवाने भाजपाची वाट धरणे वेदनादायी आहे. आयुष्यभर ज्या माणसाने कधीच विचारांची तडजोड केली नाही. हयातीत कधी डावा विचार सोडला नाही. त्या माणसाच्या नातवाने भाजपात जावे यासारखे लाजिरवाणे ते काय असू शकते ? क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्थापन केलेल्या प्रती सरकारच्या तुफान सेनेचे प्रमुख असलेल्या जी. डी. बापूंनी सत्तेसाठी कधीच वैचारिक व्यभिचार केला नाही. कधी सत्तेला शरण जात गुडघे टेकले नाहीत. त्याच जी. डी. बापूंचा नातू भाजपात जातो हे धक्कादायक आहे. खरेतर बापूंच्या नातवाने बापूंचीच केलेली ही विटंबना आहे. हे चित्र पाहून बापूंचा आत्मा रडत असेल. आयुष्यभर आपण काय जगलो आणि आपले वारसदार कसे निघाले ? हा प्रश्न बापूंच्या आत्म्याला बोचत असेल. बापू ढसा ढसा रडत असतील. त्यांना या गोष्टीचं खुप दु:ख झालं असेल. म्हणूनच, “जी. डी बापू तुम्ही रडू नका, तुमचा शरद भरकटलाय !” असं सांत्वनपर सांगाव वाटतं. पण अशा सांत्वनाने जी. डी बापूंच्या वेदना कमी होतील काय ? हा ही प्रश्न आहे.
कमळाबाईच्या सत्ता साैंदर्याला बापूंचा नातू भुलला की कुणा असंगाशी संग झाला म्हणून त्याने ही वाट धरली ? असे अनेक प्रश्न बापूंना पडत असतील. आज जर जी. डी. बापू असते तर कदाचित बापूंनी लाडक्या शरदचा कान पकडला असता किंवा एखादी कानफटात नक्कीच लगावली असती. भरकटलेल्या शरदला बापूंनी आपला वारसा काय आणि तु करतोस काय ? असा सवाल करत भानावर आणलं असतं. बापूंना हा धक्का सहन झाला नसता. आजवर अनेक मोठ-मोठ्या लोकांचे वारसदार पोकळ बांबूसारखे निघाले आहेत. हे सगळे वारसदार मोठ्या माणसाच्या, महापुरूषांच्या रक्ताचे, त्यांच्या संपत्तीचे जरूर वारस आहेत पण त्यांच्या विचारांचे वारसदार नाहीत. फार कमी वारसदार विचारांची संपत्ती टिकवून आहेत. आजवर कुंडलच्या लाड घराने जी. डी बापूंच्या विचारांची संपत्ती जोपासली होती. टिकवून ठेवली होती. पण शरद लाडांनी भाजपाची वाट धरत त्या संपत्तीची धुळधाण केली आहे. आपण केवळ जी. डी बापूंच्या संपत्तीचेच वारस आहोत हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी जी. डी बापूंची संपत्तीच आपली आहे, त्यांच्या विचारांशी आपले देणेघेणे नाही हे सिध्द केले. आपणही इतर वारसदारांसारखेच पोकळ बांबू आहोत हे त्यांनी दाखवून दिले आहे. कुणाचा विचार काय असावा ? कुणी कुठल्या पक्षात जावं ? कुठल्या संघटणेत जावं ? याचं ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे. शरद लाडांनी खुषाल कुठल्याही पक्षात जावे. या निर्णयाचा त्यांना पुर्ण हक्क व अधिकार आहे पण जी. डी बापूंसारख्या माणसाचा वारसा सांगायचा तर तो विचारही जपला पाहिजे. त्यांचा विचार डावलून, मारून वारस म्हणून मिरवण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. तुम्हाला त्यांचा विचार नको असेल तर त्यांचे नाव घ्यायचाही अधिकार तुम्हाला नाही. शरद लाडांनी आता क्रांति कारखान्याचे नाव बदलून गोळवळकर, हेगडेवार किंवा भिडे सहकारी साखर कारखाना असे नामकरण करायला हरकत नाही. कारखाना स्थळाजवळ क्रांतिसिंह नाना पाटलांचा व जी. डी बापूंचा पुतळा आहे. आता तिथे गोळवळकरांचा व हेगडेवारांचा पुतळा उभा करावा. कारण सत्तेच्या खेळात जी. डी बापूंचा विचार फोल ठरवला जातो आहे. त्यांनी आयुष्यभर जपलेल्या विचारधनापेक्षा वारसदारांना सत्ता सरस वाटत असेल, गोळवळकर, हेगडेवारांचे विचार मोठे वाटत असतील तर तिथे क्रांतिसिहांच्या व बापूंच्या पुतळ्यांचे महत्व काय असणार ? गोळवळकरांचे बोट पकडणा-यांना बापूंचे नाव घेण्याचा अधिकार काय ?
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले जी. डी. बापू लाड यांचे योगदान मोठे आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी निर्माण केलेल्या तुफान सेनेचे ते प्रमुख होते. बापू आणि त्यांचे कुंडल गाव स्वातंत्र्याचे धगधगते कुंड होते. या माणसाने व कुंडल गावाने कधीच जातीयवादी विचाराला थारा दिला नाही. कधीच डाव्या विचारांशी दगाफटका केला नाही. आपल्या उक्तीत आणि कृतीत कधी अंतर येवू दिले नाही. कालपरवा पर्यंत हे नातं असच घट्ट होतं. एकाएकी शरद लाडांनी असा कसा निर्णय घेतला ? हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. गेल्या दहा-बारा वर्षात सांगली जिल्ह्यात अनेकांनी “संघम शरणम गच्छामी” केले. सत्यजीत देशमुख, जयश्री पाटील वगैरे मंडळी भाजपात गेल्या याचे फार आश्चर्य नाही वाटले. इतरांची तर नावेही घ्यायला नको इतके ते सत्तापिपासू आणि सत्तालालसी आहेत. सत्तेच्या या डहाळीवरून त्या डहाळीवर माकडासारख्या उड्या ते मारणारच. त्यामुळे अशांच्या भाजप प्रवेशाचा धक्का काय म्हणून बसावा ? म्हणूनच त्यांच्या भाजप प्रवेशाचा धक्का नाही बसला. त्यांच्या शरणागतीचे काहीच वाटले नाही. पण शरद लाडांचा भाजपा प्रवेश मात्र मनाला बोचून गेला. शरद लाडांनी “संघम शरणम गच्छामी” करावे ? शरद लाडांनी स्वत:च आपल्या आजोबांची लक्तरं काढावीत ? हे वेदनादायी आहे.
जी. डी बापू लाड अनेक वर्षे क्रातिसिंह नाना पाटलांच्या शेतकरी कामगार पक्षाचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर ते हयातभर डाव्या चळवळीत राहिले. भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे त्यांच्याकडे महत्वाचे पद होते. हयातभर त्यांनी डावा विचार सोडला नाही. तोच विचार घेवून त्यांनी अनेक लढे लढले. सत्तेशी पंगा घेतला. त्या काळात ते कॉग्रेसमध्ये गेले असते तर मंत्री झाले असते पण जी. डी. बापूंनी सत्तेसाठी कधीच वैचारिक व्यभिचार नाही केला. सत्तेसाठी कुणाला शरण जाणे त्यांना पटले नाही. कुंडलच्या मातीत सातत्याने जातीयवादी विचारांच्या विरूध्द जागर केला गेला आहे. समतावादी विचारांचा प्रचार-प्रसार केला गेला. असं असताना शरद लाडांना ही अवदसा कशी सुचली ? हा प्रश्न पडतो. भाजपा शरद लाडांना नेमकं काय देणार आहे ? राज्याचे मुख्यमंत्री पद, गृहमंत्री पद की सांगलीचे पालकमंत्री पद ? भाजपवाले नेमकं असं शरद लाडांना काय देणार आहेत की त्यांना बापूंच्या विचारांशी दगाफटका करावा वाटला ? हा प्रश्न मात्र कोड्यात टाकणारा आहे.







