Home नागपूर मतचोरी आणि सत्ताधिकाऱ्यांची शिरजोरी: लोकशाहीच्या पाया खाली घडणारी भेग

मतचोरी आणि सत्ताधिकाऱ्यांची शिरजोरी: लोकशाहीच्या पाया खाली घडणारी भेग

248

देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर आज गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. निवडणुकीच्या काळात वारंवार समोर येणाऱ्या मतचोरीच्या आरोपांनी आणि सत्ताधाऱ्यांच्या शिरजोरीच्या घटनांनी जनतेच्या विश्वासाचा पाया हादरवला आहे. लोकशाहीचा आत्मा असलेले मतदान आता अनेक ठिकाणी केवळ औपचारिकता ठरत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे. लोकशाही म्हणजे जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेद्वारे चालणारा शासनप्रकार. परंतु आजच्या काळात हाच लोकशाहीचा पाया हलू लागला आहे. कारण वाढत चाललेली मतचोरी, सत्तेची लालसा आणि सत्ताधिकाऱ्यांची शिरजोरी. निवडणूक हा लोकशाहीचा सण असावा, पण तो आता पैशांचा, सत्तेचा आणि प्रभावाचा खेळ बनत चालला आहे. आज बहुसंख्य राजकीय नेत्यांना सत्ता म्हणजे सेवा नव्हे, तर संपत्ती आणि स्वतःच्या अहंकाराची पूर्तता वाटू लागली आहे. त्यासाठी ते काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत. मग ती मतदारांची फसवणूक असो, मतदान यंत्रे हाताळण्याचे आरोप असोत किंवा जनतेच्या नावावर राजकारण करून स्वतःचे पोट भरणे असो. जनतेचा मतदानाचा अधिकार हा सर्वात पवित्र आहे. पण जेव्हा मतचोरीच्या अफवा आणि पुरावे समोर येतात, तेव्हा लोकांचा विश्वास डळमळतो. त्या क्षणी लोकशाहीला जणू कुणीतरी छेद दिला आहे, असे वाटते.

          सत्तेची खुर्ची राखण्यासाठी काही नेत्यांना आता कायद्याची आणि नैतिकतेची बंधने गौण वाटू लागली आहेत. मतदारांची मने जिंकण्याऐवजी ती विकत घेण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. सोशल मीडियापासून मतमोजणी यंत्रांपर्यंत सर्वत्र शंका निर्माण होत आहेत. लोकशाहीचा पाया असलेला जनतेचा विश्वासच जेव्हा डळमळतो, तेव्हा लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात येते. या परिस्थितीत माध्यमांनी लोकशाहीचा प्रहरी म्हणून भूमिका पार पाडणे अत्यंत गरजेचे आहे. मतचोरीच्या प्रकरणांवर सत्य उघड करणारे निर्भय पत्रकार आणि सजग नागरिकच या काळाचा खरा आधार आहेत. समाजानेही भीती बाजूला ठेवून सत्याचा आवाज बुलंद करायला हवा.

         मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाला दिलेला पवित्र अधिकार आहे. पण जेव्हा त्या मताची चोरी होते, तेव्हा ती केवळ राजकीय फसवणूक नसते तर ती जनतेच्या आशेचा आणि विश्वासाचा अपमान असतो. जनतेच्या स्वप्नांवर गदा आणणारी ही प्रवृत्ती थांबवणे हे प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे. मतांची चोरी म्हणजे जनतेच्या स्वप्नांची चोरी. एका मतदाराने मतदान करताना देशाबद्दल, भविष्याबद्दल आणि आपल्या मुलांबद्दल स्वप्न पाहिलेली असतात. पण जेव्हा ती मते विकली जातात, खोटी मोजली जातात किंवा लपवली जातात. तेव्हा ती केवळ मतांची नव्हे, तर जनतेच्या आशेची चोरी असते. हीच ती वेळ असते जेव्हा लोकशाही मृत्यूशय्येवर जाते आणि शासन एकाधिकारशाहीत रूपांतरित होते. 

        सत्ताधिकाऱ्यांची शिरजोरी “आम्हीच कायदा” असा अहंकार. सत्ता टिकवण्यासाठी आज अनेक जण कायद्यापेक्षा वर असल्याचा आविर्भाव करतात. प्रशासन, यंत्रणा, न्यायव्यवस्था सर्व काही आपल्या मुठीत असल्याचा भ्रम निर्माण होतो. सर्व काही आपल्या ताब्यात असल्याचा अहंकार त्यांच्या वर्तनातून झळकतो. पण विसरतात ते एकच सत्य की, जनतेच्या श्वासावर कोणाचंही नियंत्रण नाही. इतिहास साक्षी आहे, जिथे सत्ताधारी अहंकाराने माणुसकी विसरतात, तिथे क्रांती जन्म घेते आणि ती क्रांती बंदुकीची नसते. ती असते जनतेच्या मनातील जागृतीची क्रांती. अहंकाराचे साम्राज्य नेहमी तात्पुरतेच ठरते. आज माध्यमांनीही लोकशाहीचे आरसे राहणे आवश्यक आहे. पण काही माध्यमे सत्तेच्या जाहिरातीचे पोस्टर बनली आहेत. सत्य बोलणाऱ्यांना आवाज द्या, आणि मतचोरीचा पर्दाफाश करा, ही समाजाची आणि पत्रकारितेची जबाबदारी आहे.

         लोकशाही फक्त मतदानाच्या दिवशी जिवंत नसते, ती दररोज जागी ठेवावी लागते. मतचोरी आणि सत्तेचा दुरुपयोग थांबवायचा असेल, तर प्रत्येक नागरिकाने आपल्या मताचा सन्मान करावा, विक्रीला नकार द्यावा आणि सत्तेच्या अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहावे. आज गरज आहे धैर्याची, जागृतीची आणि प्रामाणिकपणाची. कारण जोपर्यंत जनतेचे मत विकत घेतले जाते, तोपर्यंत खरी लोकशाही उभी राहू शकत नाही आणि जोपर्यंत सत्ताधाऱ्यांचा अहंकार मोडला जात नाही, तोपर्यंत न्यायाचा सूर्य उगवणार नाही. कारण, मत विकले की भविष्य हरते आणि आवाज उठवला की लोकशाही जिंकते.

✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९