Home अमरावती संत शिरोमणी संत नामदेव महाराज

संत शिरोमणी संत नामदेव महाराज

227

भागवत धर्माचे आद्य प्रचारक,संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करणारे भागवत धर्म प्रसारक, भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत पोहचविणारे प्रचारक संत,आद्य कीर्तन प्रवर्तक,कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करणारे आद्य कीर्तनकार, मराठी व ब्रज भाषांमध्ये काव्यरचना करणारे तत्कालीन काळातील कवी संत शिरोमणी नामदेव महाराज यांना आज दि.२६ ऑक्टोबर २०२५ ला असलेल्या त्यांच्या ७५५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥

         *संत नामदेव ।* 

         *आज जन्मदिन ॥* 

         *करांनी वंदन ।* 

         *कोटी कोटी ॥* 

               संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्म सन : १२७० सालातील ऑक्टोबर महिन्याच्या २६ तारखेला झाला.(शके ११९२, कार्तिक शुद्ध एकादशी) .त्यांचे जन्मगाव सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे मानले जाते, तर काहिंच्या मते पंढरपूर. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेटी (किंवा दामाशेटी रेळेकर) आणि आईचे नाव गोणाई होते.संत नामदेवांच्या पत्नीचे नाव राजाई होते आणि त्यांना नारा, विठा, गोंदा,महादा हे चार पुत्र आणि लिंबाई नावाची कन्या होती.

         संत नामदेवांची लहानपणापासूनच श्रीविठ्ठलावर अनन्यसाधारण भक्ती होती.संत ज्ञानेश्वर हे त्यांचे समकालीन होते आणि नामदेव महाराजांनी त्यांच्या सोबत तीर्थयात्रा केली.संत गोरोबा काका यांच्याकडे झालेल्या संतांच्या भेटीदरम्यान त्यांना ‘कच्चा’ म्हणून संबोधले गेले, त्यानंतर त्यांनी गुरूपदेश घेतला.विसोबा खेचर हे त्यांचे आध्यात्मिक गुरू होते .त्यांनी ‘नामवेदाचे’ आणि ‘नामविद्येचे’ महत्त्व महाराष्ट्रात रुजवले.संत नामदेवांचे ‘कीर्तन’ हा भागवत धर्माच्या प्रचाराचा मुख्य आधार होता.

 *’नामदेव कीर्तन करी,* 

 *पुढे देव नाचे पांडुरंग’* 

अशी त्यांची महती होती.

 ‘ *नाचू कीर्तनाचे रंगी,* 

 *ज्ञानदीप लावू जगी’*

 हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

        *प्रबोधन कार्य ।* 

        *कीर्तनात केले ॥* 

        *जन सुज्ञ केले ।* 

        *पुण्य भावे ॥* 

त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार करीत असताना कीर्तनातून समाज प्रबोधन केले.त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे मोठे कार्य केले.काव्यातून आणि अभंगातून समाजपरिवर्तनाचे कार्य त्यांनी केले.

        *परिवर्तनाचे ।* 

        *शब्द अभंगात ॥* 

        *सुधारक संत ।* 

        *नामदेव ॥* 

               संत नामदेव मराठी भाषेतील सर्वाधिक जुन्या कवींपैकी एक आहेत.त्यांना मराठीतील पहिले चरित्रकार आणि आत्मचरित्रकार मानले जाते.त्यांनी संत ज्ञानेश्वरांचे चरित्र अनेक अभंगांतून लिहिले आहे.

        संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीच्या प्रसंगाचे वर्णन संत नामदेवांनी ७२ अभंगांमधून केले आहे.या अभंगांना ‘समाधीचे अभंग’ असेही म्हटले जाते, आणि संत नामदेवांना खऱ्या अर्थाने ‘आद्य संतचरित्रकार’ मानले जाते कारण त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील या महत्त्वाच्या घटनेचे अत्यंत भावस्पर्शी वर्णन केले आहे.संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांचे चरित्र त्यांच्या ‘आदी, समाधी आणि तीर्थावळी’ या रचनेतील तीन अध्यायांमधून उलगडले आहे.या संदर्भात, विशेषतः संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीसंबंधी 

नामदेवांनी समाधी प्रसंगाचे वर्णन केले आहे.संपूर्ण चरित्र वर्णन करणाऱ्या अभंगांची नेमकी संख्या ‘७२’ पेक्षा अधिक असू शकते ; परंतु ‘आदी, समाधी आणि तीर्थावळी’ या रचनेतील तीन अध्याय हे ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात.संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतल्यानंतर संत नामदेवांनी त्यांच्यावर अनेक अभंग रचले आहेत. या अभंगांमध्ये ज्ञानेश्वरांच्या महान कार्याचे, त्यांच्या योग सामर्थ्याचे, ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाच्या महतीचे आणि त्यांच्या संजीवन समाधीच्या प्रसंगाचे वर्णन आढळते.नामदेवांच्या काही प्रसिद्ध अभंगांमध्ये, ज्ञानेश्वरांना ‘माऊली’ (योग्यांची माऊली) म्हणून गौरवले आहे आणि त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाचे माहात्म्य सांगितले आहे. उदा.

“ज्ञानराज माझी योग्यांचि माऊली। 

जेणे निगमवल्लि प्रकट केली ॥

गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ।

आणि ब्रह्मानंद लहरी हेलावली ॥

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ।

एक तरी ओवी अनुभवावी ॥”

                 संत नामदेवांच्या अभंगगाथेत सुमारे २५०० हून अधिक अभंग समाविष्ट आहेत.त्यांनी मराठीसह ब्रज आणि हिंदी भाषांमध्येही काव्यरचना केल्या.’ संत नामदेवजी की मुखबानी’ या नावाने त्यांची सुमारे ६१ हिंदी पदे (अभंग )शीख धर्मियांच्या ‘गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र ग्रंथात समाविष्ठ आहेत.त्यांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे फार मोठे कार्य केले.पंजाबमधील शीख बांधव त्यांना ‘नामदेव बाबा’ म्हणून आदराने मानतात.त्यांनी आयुष्यातील शेवटची सुमारे २० वर्षे उत्तरेकडील पंजाब प्रांतात व्यतीत केली आणि तेथे भागवत धर्माची पताका रोवली,प्रचार केला.

        संत जनाबाई या त्यांच्या कुटुंबातील सदस्य होत्या,ज्या स्वतःला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. ‘एका नामे हरिजोडे’ ही त्यांची प्रमुख शिकवण होती म्हणजेच नामस्मरणाला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले.वयाच्या ८० व्या वर्षी सन : १३५० सालातील जुलै मासाच्या ३ तारखेला (शके १२७२, आषाढ कृष्ण त्रयोदशी) त्यांनी पंढरपुरात समाधी घेतली. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर त्यांची समाधी ‘नामदेवांची पायरी’ म्हणून आजही वारकरी मंडळी अत्यंत आदराने पूजतात.संत नामदेवांच्या आज दि.२६ ऑक्टोबर २०२५ ला असलेल्या ७५५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥

          *संत नामदेव ।* 

          *करितो नमन॥* 

          *करांनी वंदन।* 

          *जन्मदिनी॥* 

  ✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)८०८७७४८६०९