Home चंद्रपूर गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर स्थायी निगराणी पथकाची करडी नजर- ४४ वाहने...

गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर स्थायी निगराणी पथकाची करडी नजर- ४४ वाहने जप्त तर ३७ लाखांच्या वर दंडात्मक वसुलीसह अकरा गुन्हे दाखल

144

▪️राजुरा तालुक्यातील सात रेती घाटावरून पात्र घरकुल लाभार्थ्यांना मिळणार विनामूल्य रेती

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.११नोव्हेंबर):- राजुरा तालुका अंतर्गत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक यावर आढा घालण्यासाठी तालुकास्तरावर दिवसा व रात्रपाळीसाठी स्थायी निगराणी पथक गठीत करण्यात आले आहे. तसेच स्थायी निगराणी पथकाविषयीची माहिती राजुरा व विरुर स्टेशन पोलिस स्टेशन यांनाही वेळोवेळी पाठविण्यात येते. या निगराणी पथकाने केलेल्या कार्यवाही नुसार अवैध गौण खनिज प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) व ४८(८) अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

यामध्ये सन २०२४-२५ यावर्षात तब्बल ४५ वाहने जप्त करण्यात आली तसेच ३३ लाख १२ हजार १६० रुपये दंडात्मक वसुली करून शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली तर नऊ प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले. तसेच सन २०२५-२६ या वर्षात आतापर्यंत ४४ वाहने जप्त करण्यात आली असून ३७ लाख ३८ हजारांची दंडात्मक वसुली करण्यात आली व अकरा प्रकरणात गुन्हे दाखल केले. महसूल विभागामार्फत जप्त केलेल्या वाळूसाठ्यातून घरकुल लाभार्थ्यांना सन २०२४-२५ मधे एकूण ४४ ब्रास रेतीसाठा ११७ घरकुल लाभार्थ्यांना तर सन २०२५-२६ मध्ये दिनांक ८ एप्रिल २०२५ चे तरतुदीनुसार नदी – नाले व अवैध गौण खनिज उत्खननात जप्त केलेल्या रेतीसाठ्यातून एकूण २३६ घरकुल लाभार्थ्यांना ५७८ ब्रास रेती मोफत वाटप करण्यात आली.

३१ ऑक्टोबर ला महसूल विभागाच्या झालेल्या बैठकीत तालुक्यात सात रेती घाट निश्चित करण्यात आले आहे. ज्यामध्ये मौजा माथरा, धोपटाळा , गोवरी, राजुरा, विहीरगाव , नलफडी व खांबाळा येथील अंदाजीत एकूण रेती साठा ५८०४ ब्रास घरकुल पात्र लाभार्थ्यांना या घाटावरील रेती विनामूल्य देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. वाळू उत्खननाकरिता मजूर आणण्याची व वाहतुकीची व्यवस्था मात्र लाभार्थी यांना करावी लागेल. लाभार्थी यांनी मागणी केलेल्या त्यांना मंजूर केलेल्या वाळूचे परिणाम विचारात घेऊन उत्खनन व वाहतुकीचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. वाळू वाहतुकी करिता ट्रॅक्टर अथवा सहा टायरचा टिप्पर चा वापर करणे हे मात्र बंधनकारक असणार आहे. घरकुल लाभार्थी यांनी आपले ग्रामसेवक , नगरपरिषद यांना संपर्क करून रेती वाहतूक पास उपलब्ध करून घ्यावीत. वाहतूक पास शिवाय रेती वाहतूक करू नये. वाहतूक पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पास संबंधित ग्रामसेवक यांच्याकडे जमा करावे असे आवाहन तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांनी केले आहे.

                    राजुरा तालुक्या अंतर्गत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक यावर आळा घालण्याकरिता तालुकास्तरावर स्थायी निगराणी पथक गठीत करण्यात आलेले असून हे पथक सातत्याने अवैध रेती वाहतूक करणाऱ्याचे वाहन जप्त करून दंडात्मक कार्यवाही करीत आहे. तसेच या प्रकरणात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही सुद्धा करीत आहे. महसूल विभागाची अवैध रेती वाहतुकीवर करडी नजर आहे. पात्र घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळावी याकरीता तालुक्यातील सात रेती घाट निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार महसूल विभागाने घालून दिलेल्या नियम अटींची पूर्तता करणाऱ्यास रेती वाहतूक पास देण्यात येतो. वाहतूक पूर्ण झाल्यानंतर तो पास संबंधित ग्रामसेवक यांच्याकडे जमा करावे लागणार आहे अशी माहिती तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांनी दिली आहे.