

▪️राज्यस्तरीय श्रीचक्रपाणी प्रभू ग्रामस्वच्छता अभियान व जन्मोत्सव सोहळा संपन्न
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
नागभीड(दि.13नोव्हेंबर):-उच्चवर्णीय कुळात जन्म होऊनही सुमारे ९०० वर्षांपूर्वी हातात सूप व खराटा घेऊन ग्रामस्वच्छतेचा कृतीशील संदेश या भारतभूमीमध्ये देणारे महानुभाव धर्माचे तिसरे अवतार श्रीचक्रपाणी प्रभू महाराज जातीअंताचे व ग्रामस्वच्छतेचे आद्य पुरस्कर्ते आहेत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध युवा व्याख्याते व किर्तनकार, होय होय वारकरी या प्रसिद्ध ग्रंथांचे लेखक ह.भ
प. ज्ञानेश्वर बंडगर, सोलापूर यांनी केले. ग्रामस्वच्छतेचे आद्य प्रणेते महानुभाव धर्माचे तिसरे अवतार श्रीचक्रपाणी महाराज ( कार्यकाल शके १०४३ ते ११४२) यांच्या ग्रामस्वच्छताविषयक कार्याची माहिती प्रत्यक्ष आचरणाद्वारे जणमाणसांत रुजविण्यासाठी तसेच त्यांच्या समाजोद्धारक विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा) ता. नागभिड जि. चंद्रपूर द्वारा राज्यस्तरीय श्रीचक्रपाणी प्रभू जन्मोत्सव व ग्रामस्वच्छता अभियान हा आचरणशील समाजनिर्मीतीचा कृतीशील उपक्रम मागील १३ वर्षांपासून राज्यभरात राबविण्यात येत आहे. या संपूर्ण उपक्रमाचा समारोपीय सोहळा संत गाडगेबाबांच्या चरणस्पर्शाने पुनित झालेल्या मौजा. किरणापूर (काचूरवाही) ता. रामटेक जि. नागपूर येथे दि.०८ व नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते.
कुठलाही शासकीय निधी न घेता लोकवर्गणीतून व लोकसहभागातून सर्वज्ञ विचारमंच द्वारा राबविण्यात येणारा राज्यस्तरीय स्वच्छता अभियान हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महानुभाव पंथाचे विकासपुरुष, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कविश्वर कुळाचार्य महंत श्रीकारंजेकर बाबा, अमरावती यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचा आयोजकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राला परमेश्वर अवताराचा व संतपंरेचा एक मोठा वारसा लाभलेला असून या देशात लोकशाही मुल्ये जणमाणसांत रुजविण्यासाठी संतविचार व सर्वधर्मसंप्रदायांमध्ये समन्वय साधणे अत्यंत महत्वाचे आहे असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे ध्वजारोहक आचार्यप्रवर महंत श्रीवाकीकर बाबा श्रीक्षेत्र, देवबर्डी यांनी केले.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यीक व ऐतिहासिक जडणघडणीत महानुभाव पंथाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून महानुभाव पंथाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे विचार या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे राज्यमंत्री व रामटेक विधानसभेचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क, अहिंसा या मुल्याधारीत विचारांमध्ये आदर्श समाजनिर्मीती करण्याचे सामर्थ्य असून हे विचार जणमाणसांत रुजविणे अत्यंत गरजेचे आहे असे विचार या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्रीअजयराज वाकीकर, करंभाड यांनी व्यक्त केले. यावेळी ईश नामस्मरण यज्ञ या महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी महंत श्रीअळजपूरकरबाबा, नागपूर, महंत श्री तिलकराजबाबा कारंजेकर नागपूर, साजनकुमार शेंडे, मोटार वाहन निरीक्षक, नागपूर ग्रामीण, महंत भाविकराजबाबा, मौदा, ई. श्री श्रेयसमुनी जामोदेकर करंभाड विचारमंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तृषाल रामटेके, प्रास्ताविक श्री. विलास रामटेके व आभार निकेश अलोने यांनी केले. या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी सामाजिक, आध्यात्मिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महंत श्रीमाधवव्यासबाबा चिरडे, देवळी, पू.ई. श्रीभक्तराजदादा कारंजेकर , माथनी, श्री. साक्षेधन कडबे, किरणापूर, डॉ. हंसराज ढोके, मनसर, डॉ. साहेबराव बारसागडे, वलनी जि. चंद्रपूर, सुकेशनी सुर्यवंशी, नागपूर यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी भव्य रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, मोफत हिमोग्लोबिन व रक्ततपासणी शिबिर ई. सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
श्रीचक्रपाणी स्वच्छता अभियानाला व्यापक स्वरूप लाभणार
राज्यस्तरीय श्रीचक्रपाणी प्रभू ग्रामस्वच्छता अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यभरातील कानाकोपऱ्यात हा उपक्रम राबविण्यात येईल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार अशी ग्वाही अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कविश्वर कुळाचार्य महंत श्रीकारंजेकर बाबा यांनी यावेळी उपस्थितांना दिली.







