

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
▪️पंडित जवाहरलाल नेहरू जी यांच्या जयंती निमित्त उत्साहात साजरा केला बालदिन
▪️विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावी मराठी विषयाच्या बालसभा पाठाचा घेतला प्रत्यक्ष अनुभव
राजुरा(दि.१४नोव्हेंबर):-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले होते. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता सहावीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात बालसभा नावाचा पाठ आहे. यात विद्यार्थी सर्व कार्यक्रमाचे नियोजन करतात. त्यामुळे मराठी विषय शिक्षक बादल बेले यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यास सूचना केल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यार्थी अर्पित बरडे यांनी भूषविले. तर विशेष अतिथी म्हणून बालाविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भास्करराव येसेकर, संचालक मधुकरराव जाणवे, प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर व शाळेतील सर्वच शिक्षकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी योगिता पिंपळकर व अर्पिता जुनघरी यांनी केले. प्रास्ताविक नंदनी भंडारवार यांनी तर आभार कामाक्षी तिरूपत्त्तीवार हिने मानले. यावेळी मान्यवरांचे वृक्षकुंडी देऊन स्वागत करण्यात आले.पाठ्यपुस्तकातील शिक्षण कृतीयुक्त दिल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरते असे प्रतिपादन विषय शिक्षक बादल बेले यांनी केले.
भास्कर येसेकर यांनी विद्यार्थी हा कार्यक्रमाचा अध्यक्ष झाल्याने व विद्यार्थी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करीत असल्याने बालदिनाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे मत व्यक्त केले. यावेळी शाळास्तरावरील विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.







