

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.1नोव्हेंबर):-नागपूर स्किल सेंटर केवळ नागपुरातीलच नाही तर विदर्भातील लाखो युवकांच्या रोजगाराचे स्वप्न साकार करेल आणि विदर्भाच्या प्रगतीला गती देईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले केले.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) चे विदर्भ ग्लोबल फाउंडेशन, नागपूर महानगरपालिका आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने “नागपूर स्किल सेंटर” या कौशल्य विकास उपक्रमाचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया ‘मेत्री, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मनपा, एआयडी आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्यात सामंजस्य करार सुद्धा करण्यात आला.
याप्रसंगी रोजगार निर्मिती बद्दल बोलताना गडकरी यांनी सांगितलं की “उद्योग आणि कृषी क्षेत्रात विकास तेव्हाच होईल जेव्हा उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक वाढेल. त्यातून रोजगार वाढेल, प्रति व्यक्ती उत्पन्न वाढून गरीबी दूर होईल. विदर्भाच्या विकासासाठी आमचे लक्ष राज्याच्या जीडीपीमध्ये विदर्भाचा वाटा वाढवण्याकडे आहे.”
ते पुढे म्हणाले, “विदर्भातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एआयडी व टाटा स्ट्राईव्ह यांच्यात झालेला करार कौतुकास्पद आहे. पण केवळ शहराला स्मार्ट करून होणार नाही तर ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. स्मार्ट शहरांसोबत स्मार्ट गावेही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली . पुढील पाच वर्षात विदर्भातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 5 हजार युवकांना देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवावे. त्याकरिता स्कील सेंटरची भविष्यात संख्या वाढवावी, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.
गडकरी यांनी मिहानमध्ये आतापर्यंत एक लाख रोजगार निर्माण झाल्याचे नमूद करून सांगितले की, “विदर्भात कोणत्या उद्योगाना कोणते कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची गरज आहे,याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले.
“एआयडी, टीसीआयटी आणि मनपा या तीन संस्थांच्या सहकार्याने नागपूर स्किल सेंटरची स्थापना होत आहे. पारडी येथे ३० हजार चौरस फूट क्षेत्रावर हे केंद्र उभे राहिले आहे. पुढील महिन्याभरात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारीपासून अभ्यासक्रम सुरू होतील,” अशी ग्वाही नागपूर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. नागपूरसह विदर्भात वेगाने औद्योगिक विकास होत असून त्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. ही बाब ध्यानात घेऊन हे स्कील सेंटर विक्रमी वेळेत सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांनी एआयडीच्या कार्याचा आढावा घेतला. विदर्भाच्या औद्योगिक विकासाकरिता एआयडीतर्फे विदर्भ ग्लोबल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे विदर्भ ग्लोबल स्किल अँड लॉजिस्टिक्स युनिव्हर्सिटीची स्थापना आणि संचालन करण्याचा उद्देश आहे. भविष्यासाठी तयार कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या आणि प्रदेशात औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने उचललेले एआयडीचे नागपूर स्किल सेंटर एक पाऊल आहे, असे ते म्हणाले.
टाटा स्ट्राईव्ह आणि मनपा यांच्या सहकार्याने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हॉटेल, मेडिकल, सोलर टेक्निशियन, ईव्ही, इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्रांमध्ये १० अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘नागपूर स्किल सेंटर’ हे पूर्व नागपूरच्या मौजा पुनापूर येथे सुमारे 2903.86 चौरस मीटर जागेवर बांधले जाणार असून या केंद्रात किमान पात्रता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे .
हॉस्पिटॅलिटी, कन्स्ट्रक्शन, सोलर टेक्निशियन, ऑटो सर्व्हिस टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक फिल्ड टेक्निशयन इत्यादी अभ्यासक्रम या केंद्रात उपलब्ध राहणार असून 75 टक्के प्रशिक्षणार्थी हे शहरातील रहिवासी असणे बंधनकारक असणार आहे.







