Home महाराष्ट्र तप याचा अर्थ चमत्कार नव्हे, तर आत्मसंयम…

तप याचा अर्थ चमत्कार नव्हे, तर आत्मसंयम…

128

अहंकाराच्या आहारी गेलो की साधना व्यर्थ ठरते. ज्ञानाला नम्रतेची जोड नसली, तर ते विनाशाचे कारण बनते हे उदाहरण म्हणजे गोशालक चरित्र होय. संयम, सत्य आणि नम्रता हे भगवान महावीर यांच्या साधनेचा मार्ग हा आत्म्याच्या उत्कर्षाचा मार्ग आहे. भगवान महावीर स्वामी यांनी दिलेली मार्गाने आपले जीवन जगत रहावे असा मोलाचा संदेश आजच्या उपक्रमातून मिळाला. जळगाव येथील आर.सी. बाफना स्वाध्यायभवन येथे श्रमाणी सूर्या, राजस्थान प्रवर्तिनी प. पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. आदि ठाणा ६ यांच्या पावन सान्निध्यात आत्मोत्कर्ष चातुर्मास सुरू आहे. चातुर्मास हा अंतिम टप्प्यात असून यामध्ये आज गोशालक चरित्र वाचन करण्यात आले. यात सुमारे २०० श्रावक-श्राविका उपस्थित होते. या उपक्रमात सकाळी ७.०० ते ९.४५ सहभागी झालेल्यांना ३ सामायिक घडल्या हे विशेष!  

आजच्या दिवशी प्रवचना ऐवजी गोशालक चरित्र वाचन करण्यात आले. मंखली गोशालक. जैन धर्माच्या इतिहासात तो भगवान महावीरांचा समकालीन आणि विरोधक होता. गोशालकाचा जन्म मागध देशात झाला. त्याचे बालपण गरिबीत गेले, पण ज्ञानलालसा प्रचंड होती. तो सत्य, आत्मा आणि मोक्षाच्या शोधात घर सोडून फिरू लागला. प्रवासात त्याची भेट भगवान महावीरांशी झाली. दोघे काही काळ एकत्र प्रवास करत होते. त्यांनी वनात, गावात, नगरीत साधना केली. परंतु हळूहळू गोशालकाच्या मनात चमत्काराची आणि प्रसिद्धीची इच्छा वाढू लागली. एके दिवशी तो म्हणाला, “मी माझ्या तपबलाने कोरड्या झाडाला हिरवे करीन.” योगायोगाने झाडाला पालवी आली आणि गोशालक प्रचंड अहंकाराने फुगला.

तेव्हा भगवान महावीरांनी सांगितले, “गोशालक, तपाचा अर्थ चमत्कार नव्हे, तर आत्मसंयम आहे.” पण त्याने ते मानले नाही. यानंतर गोशालकाने आजीवक संप्रदाय स्थापन केला. त्याने जगाला नियतीवादी तत्त्व शिकवले. “सर्व काही पूर्वनिश्चित आहे, माणसाच्या प्रयत्नाने काही बदलत नाही.” हे तत्त्व कर्मसिद्धांताशी विरोधात होते. भगवान महावीरांनी स्पष्ट सांगितले की “मनुष्य स्वतःच्या कर्माचा शिल्पकार आहे.” हे या चरित्र वाचनातून मोलाचे विचार श्रावक-श्राविकांना मिळाले. (नोव्हेंबर १:२०२५-जळगाव, महाराष्ट्र)

✒️शब्दांकन:-किशोर कुळकर्णी(मो:-9422776759)