Home महाराष्ट्र श्री सेवागिरी महाराज रथोत्सव देशाचा मानबिंदू ठरेल. चेअरमन संतोष वाघ

श्री सेवागिरी महाराज रथोत्सव देशाचा मानबिंदू ठरेल. चेअरमन संतोष वाघ

175

✒️सातारा खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.3नोव्हेंबर):-जिल्ह्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या 78 व्या पुण्यस्मरणानिमित्त डिसेंबर महिन्यात होणारी यात्रा भव्य आणि व्यापक स्वरूपात भरविण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. ग्रामीण संस्कृती व शहरी नावीन्यतेचा बाज असलेली ही यात्रा नावीन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक होण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ यांनी केले.

श्री सेवागिरी महाराज मंदिरातील प. पू. नारायणगिरी भक्त निवास हॉल येथे आज यात्रा नियोजनासाठी ग्रामसभा पार पडली. यावेळी मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. जाधव म्हणाले, “यात्रा नियोजनात ग्रामस्थांसोबत युवकांचासहभाग महत्त्वाचा आहे. कृषी प्रदर्शनासोबत दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूध डेअरी प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून यंदाचे कृषी प्रदर्शन भरविले जाईल.” लाखो बैलगाडी शर्यत शौकिनांचे आकर्षण असलेले ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’ मैदान देशातील आदर्शवत असं मैदान भरविण्यात येईल, असा विश्वास विश्वस्त गौरव जाधवयांनी व्यक्त केला.

यात्रेकरू आणि भाविकांसाठी मंदिर परिसर व यात्रा स्थळाजवळ सोयीसुविधा युक्त मोफत पार्किंग व्यवस्थेची गरज असल्याचे जगन्नाथ जाधव यांनी सांगितले. यात्रेतील खर्चाचा ताळमेळ घालून कार्यक्रम साजरे व्हावेत, अशी सूचना एस. आर. पाटील यांनी केली.

मयुरेश जाधव यांनी बैलबाजारात येणारे व्यापारी आणि तेथे होणाऱ्या व्यवहारांच्या नोंदी ठेवाव्यात, अशी सूचना केली. यात्रा कालावधीत होणाऱ्या गर्दीतील अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी अधिकच्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना प्रकाश जाधव यांनी केली. पुसेगाव बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई केल्याने वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटली आहे. या कारवाईत हातभार लागलेल्या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव माजी अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी मांडला. बाळासाहेब जाधव, मानसिंग सावंत, अंकुशराव जाधव, रूपेश जाधव, अशोकराव जाधव, धीरज जाधव यांनी यात्रा नियोजनाबाबत सूचना मांडल्या.

श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेला फार मोठी चांगली परंपरा आहे. यात्रेतील प्रत्येक कार्यक्रमांचे नेटके नियोजन ग्रामस्थांच्या मदतीने केले जाईल. भाविक, यात्रेकरू, व्यावसायिकांनासेवागिरी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासनाच्या मदतीने सर्व सुविधा पुरविल्या जातील, असे मत विश्वस्तांनी व्यक्त केले. दरम्यान, ऐश्वर्या प्रदीप देशमुख हिची राजपत्रित संवर्ग पदी वर्णी लागल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. संतोष वाघ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सचिव विशाल माने यांनी सूत्रसंचालन केले. विश्वस्त संतोष जाधव यांनी आभार मानले.पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ भरणाऱ्या श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेचे स्वरूप, महत्त्व आणि थाटमाट वेगळा आहे. धार्मिक, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा, आध्यात्मिक, साहित्यिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणारी देशातील सर्वात मोठी यात्रा पुसेगावमध्ये भरते. यंदाच्या यात्रेतील सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचा एकमुखी निर्धार ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये केला.