

✒️प्रतिनिधी खटाव(नितीन राजे)
खटाव(दि.17नोव्हेंबर):-मा.आ.चंद्रहार पाटील आणि मा. आ.केशवराव पाटील यांचे विचार जोपासत समाजकारण आणि राजकारणात आलो. जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम केले. आ.महेश शिंदे यांची पाठराखण करत सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. खटाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आरक्षित आहे. आमदारांनी माझे नाव निवडणुकीसाठी जाहीर केले होते. पण अचानक माझ्या बदनामीचे षडयंत्र त्यांनी सुरू केले आहे.पण आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे. भागातील वरिष्ठ सहका-यांशी विचारविनिमय करून लवकरच राजकीय निर्णय घेणार असल्याचे मत राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
खटाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कुदळे, राजेंद्र करळे, दादासाहेब मोहिते, संभाजी देशमुख, उमेश भिषे, तैमूर मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकात म्हटले आहे, आ. चंद्रहार पाटील व आ. केशवराव पाटील यांच्या विचारांची जोपासना करत राजकारण व समाजकारणात आलो. जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संघटनात्मक वाटचाल सुरू केली. तरुण व जेष्ठांची फळी पाठीशी उभी राहिली. आण्णा, दादां नंतर खटावला आमदारकी मिळावी या हेतूने आ. महेश शिंदे यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांना नेहमीच सहकार्य केले. त्यांनी दिलेल्या जबाबदा-या यशस्वीपणे पार पाडल्या. आता नऊ वर्षांनंतर जि.प व पं.स निवडणुक पार पडत आहेत.खटाव गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला आहे. अनेक वर्षांपासून आमदार माझे नाव जाहीर करत होते. मात्र अचानक माझ्यावर खोटे आरोप करत विनाकारण माझी बदनामी करत डावलण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे. माझ्यावर व स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे. सत्तेचे केंद्रीकरण रोखण्यासाठी, सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या विकासासाठी, वैचारिक लढाईसाठी आम्ही येणारी जि.प व पं.स निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भागातील वरिष्ठ व सहका-यांशी विचार विनिमय करून लवकरच राजकीय निर्णय घेणार आहे.
सुसंस्कृत व उच्च शिक्षित नेतृत्वाला संधी मिळावी : परिवर्तन संघटना
सुसंस्कृत व उच्च शिक्षित राहुल पाटील यांचे नेतृत्व सर्व समावेशक व विकासाचा दृष्टिकोन असणारे आहे. चुकीच्या पद्धतीचे राजकारण होवून त्यांना डावलण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. त्यांनी नेहमीच जी भूमिका घेतली ती प्रामाणिकपणे पार पाडली. अशा नेतृत्वाला संधी मिळायला हवी. आम्ही कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीला भक्कमपणे सामोरे जाणार आहोत.







