

राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन घेऊन सत्यशोधक साहित्यिकांना घडविणारे,पुस्तकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे ,समाजातील विविध समस्या उपेक्षित समाज महासंघाच्या माध्यमातून दूर करणारे समाजसेवक, सत्यशोधक – समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या ‘उद्योगपती महात्मा फुले आणि युवा उद्योजक’ या तेराव्या पुस्तकाचे प्रकाशन आज दि.१९ नोव्हेंबर २०२५ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय,फ्रेजरपुरा,अमरावती. येथे लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गवई यांच्या हस्ते होत आहे आणि डॉ.रजिया सुलताना, प्राचार्य डॉ.कमलाकर पायस, प्रा.डॉ.सशिला धाबे, मुख्याध्यापक मा.प्रवीण घोंगडे, प्रा.डॉ.सौ. उज्ज्वलाताई मेहरे
अभंगकार ,साहित्यिक व समीक्षक प्रा.अरुण बुंदेले या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.यानिमित्ताने प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या “उद्योगपती महात्मा फुले व युवा उद्योजक ” या पुस्तकाचा थोडक्यात परिचय देण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न.
महात्मा फुलेंच्या विविध क्षेत्रातील कार्याविषयी साहित्यिकांसोबतच जनसामान्यांना माहिती आहे. महात्मा फुले यांनी बहुजन समाजातील अंधश्रद्धेच्या विरोधात,अनिष्ठ रूढी, प्रथा-परंपरांच्या विरोधात जीवनभर संघर्ष केला,लढा दिला. त्यासाठी कशाचीही पर्वा न करता चळवळीच्या माध्यमातून संघर्ष करीत राहिले .साहित्यातून ,प्रखर शब्दातून समाजप्रबोधन करीत राहिले.हे त्यांचे कार्य अनेकांना माहिती आहे आणि त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक
क्रांतिकार्याची जगभरात दखल घेतल्याची अनेक उदाहरणे दिसतात;पण’उद्योगपती महात्मा फुले !.’कार्यकारी संचालक महात्मा फुले,अर्थतज्ज्ञ महात्मा फुले आणि शेअर मार्केट मधील त्यांच्या योगदानाची दखल बहुजन समाजाने म्हणावी तेवढी घेतली असे वाटत नाही.हा उद्देश समोर ठेवून पुस्तकाचे प्रकाशन लेखक करीत आहेत असे वाटते.
भारतातील सामाजिक गुलामगिरीच्या विरूद्ध बंड पुकारणारे आणि सर्वंकष गुलामगिरीवर हल्ला करणारे पहिले क्रांतिकारक,आधुनिक मराठी साहित्याचे आणि आधुनिक मराठी कवितेचे जनक, बहुजनांचे मुक्तिदाता,शिक्षणाचे आद्य प्रवर्तक, शिल्पकार व शिक्षणतज्ज्ञ,कृषितज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ,आधुनिक नाटककार, निबंधकार,आद्य शिवचरित्रकार, पुणे नगरीचे आयुक्त,पुणे कमर्शिअर अँड कॉन्ट्रक्टींग कंपनीचे कार्यकारी संचालक तथा प्रकाशक म्हणून महात्मा फुले यांनी भारतीय समाजावर आपली प्रभावी नाममुद्रा उमटविली.या विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी केलेला आहे.
महात्मा फुले हे कंत्राटदार ही होते. त्यांनी मुंबई, पुणे, बडोदे, सोलापूर सह इतरही ठिकाणी अनेक ऐतिहासिक वास्तू उभारण्याचे कार्य केले. बोरीबंदर स्टेशन, मुंबई मनपाची मुख्य इमारत, बडोद्याचा राजवाडा, कापड गिरण्या, रेल्वे वर्क शॉप,पूल,धरणे, कालवे, बोगदे, रस्ते बांधणी अशी अनेक स्थापत्य शास्त्रातील उच्चतम नमूने म्हणून आजही प्रसिद्ध आहेत आणि त्याच अवस्थेत आहेत हे विशेष.हे सर्व वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळेल.महात्मा फुले हे बिल्डर होते. पण आदर्श बिल्डर होते. त्यांनी बांधकामात ‘ व्कालिटी’ दिली. त्यात त्यांनी तडजोड केली नाही. बांधकामात सिमेंटचा वापर योग्य व पुरेपुर करण्यावर त्यांनी भर दिला. म्हणून त्यांनी बांधलेले पुल, बिल्डींग आजही त्यांच्या योग्य कामाची साक्ष देतात.कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे प्रत्येक बांधकाम केले. त्यांच्या ह्या कार्यापासून आजच्या बिल्डर्स लोकांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.असे लेखक प्रा.श्रीकृष्ण बनसोड म्हणतात.
“उद्योगपती महात्मा फुले आणि युवा उद्योजक” या लेखक प्रा.श्रीकृष्ण बनसोड पुस्तकाला लेडी गव्हर्नर, प्राचार्य डॉ. कमलताई रा. गवई यांची प्रासादिक भाषेतील प्रस्तावना लाभलेली आहे.या पुस्तकात पहिल्या विभागात महात्मा फुले : जन्म – बालपण व शिक्षण, महात्मा फुले आणि धर्मग्रंथाची चिकित्सा, महात्मा फुले आणि शेअर मार्केट, ख्यातनाम उद्योगपती महात्मा फुले, अर्थतज्ज्ञ महात्मा फुले,आद्य नाटककार महात्मा फुले, आद्य मराठी नाटक तृतीय रत्न,आणि जोतीराव महात्मा झाले अशा सात प्रकरणातून महात्मा फुलेंचे कार्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने केलेला आहे.हे सर्व प्रकरण वाचल्यानंतर असे वाटते की ,हे पुस्तक संग्राह्य आहे. सार्वजनिक वाचनालय, शाळा महाविद्यालयातील वाचनालयात तर हे पुस्तक असायलाच पाहिजे शिवाय प्रत्येकाने हे पुस्तक घेतल्यास उद्योगपती महात्मा फुले यांचे दर्शन त्यांना घडेल यात शंका नाही ,तसेच या निमित्ताने या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात फुले- शाहू -आंबेडकर चळवळीतील २३ उद्योजकांच्या विविधांगी कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न “युवा उद्योजक”या भागात लेखकाने केलेला आहे.
उद्योजक कसे असावे ? हे सांगण्याचा प्रयत्न जणू लेखक येथे करीत आहेत असे वाटते.पुस्तकाच्या शेवटी आठ पुस्तकांची संदर्भसूची दिलेली आहे.अभ्यासपूर्ण लेखन केल्याचा हा पुरावा आहे.परिशिष्ट एक मध्ये प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या “शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा फुले आणि ओळख कर्तृत्वाची” या पुस्तकाची समीक्षक सौ.अरुणा प्रदीप लांडे यांनी केलेली समीक्षा प्रकाशित केलेली आहे तर परिशिष्ट दोन .मध्ये लेखकाचा सविस्तर परिचय वाचकाला वाचायला मिळतो.
वर्धा येथील सुधीर प्रकाशनाचे मुख्य प्रकाशक सुधीर गवळी ,श्री उत्कर्ष गवळी यांनी अतिशय कमी वेळेत उत्कृष्ट बांधणी करून हे पुस्तक तयार करून दिले आहे . सुंदर टाईप सेटिंग श्री दिलीप पिस्तुलकर यांनी केली असून उत्कृष्ट मुखपृष्ठ व मलपृष्ठ श्री नितीन निम्बलवार ग्राफिक यांनी तयार केले आहे. अशा या समाजप्रबोधनपर पुस्तकाच्या प्रकाशनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा ॥
✒️समीक्षक:-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९







