Home नागपूर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पुढाकार

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पुढाकार

161

▪️‘शिव छत्रपती शिक्षक संघटना’ दक्षिण रायगड विभाग संपर्क कार्यालयाचा शुभारंभ!

✒️संजीव भांबोरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 नागपूर(दि.24नोव्हेंबर):-दक्षिण रायगड विभागातील शिक्षकांच्या समस्या ऐकून त्यांना तत्काळ न्याय देण्यासाठी शिव छत्रपती शिक्षक संघटना आता मैदानात उतरली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या दक्षिण रायगड संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले.

उद्घाटनाच्या वेळी फक्त औपचारिक भाषणे झाली नाहीत, तर शिक्षकांच्या प्रत्यक्ष समस्या, त्यांचे अनुभव, आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या सविस्तरपणे मांडल्या गेल्या. आमदार महोदयांनीही त्या सर्व मुद्द्यांना मनापासून ऐकून घेतले आणि तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान शिक्षकांना टप्पा वाढ अनुदान मिळवून दिल्याबद्दल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अंशतः अनुदानित शिक्षकांचे प्रश्न, TET परीक्षेतील अडचणी, फरक बिले, थकीत वेतन, वरिष्ठ वेतनश्रेणी, सेवानिवृत्त मुख्याध्यापकांची देयके, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या समस्या, अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ मान्यता, संच मान्यता दुरुस्ती, शालार्थ प्रणालीतील त्रुटी अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यातील काही तातडीच्या समस्यांवर शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई, शिक्षणाधिकारी कार्यालय आणि वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी विभागाशी आमदार महोदयांनी थेट फोनवर बोलून अधिकारी वर्गाला त्वरित सूचना दिल्या.

 याप्रसंगी शिव छत्रपती शिक्षक संघटनेचे दक्षिण रायगड जिल्हा निमंत्रक राजेंद्र पवार, सहसंपर्क प्रमुख अर्जुन कुशिरे, तसेच माणगाव तालुका अध्यक्ष आदेश सुतार, महाड शहाजी बेरे, पोलादपूर सुनिल शिंदे, श्रीवर्धन राजकुमार मुंढे, म्हसळा कमरुद्दीन बांगी, तळा पोपट कसबे, रोहा नंदकुमार देवळेकर आणि मुरूड तालुका अध्यक्ष सरोज राणे यांचा विशेष सहभाग होता. दक्षिण रायगड विभाग सर्व तालुक्यांतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दक्षिण रायगडमधील शिक्षक अनेक वर्षांपासून विविध समस्यांशी झुंज देत आहेत. अशातच हे नवीन संपर्क कार्यालय सुरू झाल्यामुळे शिक्षकांमध्ये नवीन ऊर्जेचा संचार झाला आहे. समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संघटना व आमदार महोदय तत्पर असल्याचे यावेळी राजेंद्र पवार यांनी सांगितले. शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्यायासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पवार तर निवेदन आदेश सुतार यांनी केले.