Home चिमूर नेवजाबाई हितकारिणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी आणि आनंदमेळा उत्साहात...

नेवजाबाई हितकारिणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी आणि आनंदमेळा उत्साहात साजरा

232

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.20डिसेंबर):-नेवजाबाई हितकारिणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आनंदमेळा तसेच शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. के. एम. नाईक सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री. एन. डब्ल्यू. नाकाडे सर, पर्यवेक्षक श्री. पी. आर. जीभकाटे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

शैक्षणिक साहित्य प्रदर्शन मध्ये विद्यालयातील 71 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता विद्यार्थ्यांनी विविध विषयाचे शैक्षणिक साहित्य निर्माण करून ते प्रदर्शनामध्ये सादर केले यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा समावेश होता तसेच

आनंदमेळ्यामध्ये विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ विक्रीस मांडले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी नियोजन, संघभावना, व्यवहारज्ञान आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात केले.

विशेष म्हणजे, या आनंदमेळ्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या कमाईचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. मेहनतीने तयार केलेल्या वस्तू विकून स्वतः पैसे मिळविण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. स्वतः कमावलेल्या पैशातून येणारी आत्मसंतुष्टी, जबाबदारीची जाणीव आणि आर्थिक शिस्त याचे महत्त्व या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कळले. “पैसे सहज मिळत नाहीत, त्यासाठी कष्ट, नियोजन आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असतात,” हा महत्त्वाचा जीवनधडा विद्यार्थ्यांनी या आनंदमेळ्यातून शिकला.

इतर विद्यार्थ्यांनीही विविध स्टॉल्सना भेट देत या आनंदमेळ्याचा मनसोक्त आनंद घेतला. संपूर्ण परिसर आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेला दिसून आला.

अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, स्वावलंबन व आत्मविश्वास निर्माण करण्यास उपयुक्त ठरतात, असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के एम नाईक यांनी व्यक्त केले. या आनंदमेळ्याचे आयोजन यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.