Home महाराष्ट्र जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांना दिला गंभीर...

जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांना दिला गंभीर ईशारा !!

181

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही, त्यांची ताकद नसल्यामुळे नाइलाजाने एकत्र आले आहेत, अशी टीका भाजपचे नेते करत आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांना एकत्र येण्याचा अधिकार आहेच, पण तरीही त्यामुळे अमित साटम, राम कदम वगैरेंची मळमळ बुलेट ट्रेनच्या वेगाने बाहेर येऊ लागली आहे. दोन भावांमध्ये काड्या करण्याचा त्यांचा लघुउद्योग अद्यापही थांबलेला नाही! परंतु भाजपाला येथे एका गोष्टीची आठवण करून द्यावी लागेल. १९८५ सालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने १६१ जागा जिंकल्या, तर पुरोगामी लोकशाही दल किंवा पुलोद या आघाडीचे १०४ आमदार निवडून आले होते. त्यामध्ये शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे ५५, जनता पक्षाचे २०, भाजपचे १६ आणि शेकापचे १३ आमदार होते. अपक्षांना ३६ जागा मिळाल्या होत्या. शरद पवारांना सतत लाखोली वाहणाऱ्या भाजपने पुलोद आघाडीमध्ये राहून तेव्हा ती निवडणूक का लढवली? १९७८ मध्ये पुलोद सरकारमध्ये जनसंघ होता. परंतु किमान १९८० मध्ये भाजपची रितसर स्थापना झाल्यानंतर तरी भाजपने स्वबळावर निवडणुका का लढवल्या नाहीत?

१९८५ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून मशाल चिन्हावर लढलेले छगन भुजबळ मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले, तेव्हा त्यांनी बाळासाहेबांची तत्त्वे झुगारून दिली, असे कसे म्हणता येईल? खुद्द बाळासाहेबांनीच पवारांशी तेव्हा दोस्ती केली होती. आणि उद्धव ठाकरेंना याबद्दल दूषणे देणाऱ्या भाजपने देखील तेव्हा पवारांचीच साथ केली होती. शिवाय शेवटी शरद पवार हे मूळ काँग्रेसवालेच. नेहरू-गांधी यांच्या काँग्रेस विचारांनाच मी मानतो, असे शरद पवार नेहमीच म्हणत होते व आहेत. म्हणजे आपण काँग्रेस विचार मानणार्‍या पवारांशी साथ केली तर ते पुण्य, परंतु उद्धव ठाकरेंनी तसे केले, तर मात्र ते पाप, अशी भाजपची ही लबाडीची दुहेरी निती आहे. भाजपने अन्य कोणाशीही युती केली, अगदी पवारांशी, तरी ते योग्य, परंतु उद्धव आणि राज एकत्र आले, तर ते मात्र चूक कसे?

आपल्या बरोबर असल्यास, तेव्हा त्या पक्षाला गृहीत धरायचे आणि तो विरोधात गेला की तो पक्ष ‘राष्ट्रद्रोही, जनताद्रोही’ अशी बोंब ठोकायची, ही भाजपची रीत आहे. आपल्या विरोधात कोणी गेले की ते मात्र स्वार्थी राजकारण, असा भाजपचा कांगावा असतो! भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाच्या सुरात सूर मिसळणारी एकनाथ शिंदे यांची ‘कोरस सेना’ यांची ठाकरे बंधूंवरील टीका, ही मतलबी स्वरूपाचीच आहे. लोकसभेच्या वेळी भाजपला मनसेचा उपयोग झाला. पण ‘मतलब निकल गया है तो, पहचानते नहीं, यूँ जा रहे है, जैसे हमें जानते नहीं, हीच भाजपची नीती आहे.२०२९ मध्ये अजितदादा यांचा ‘सिंचन गट’ आणि शिंदे यांचा ‘समृद्ध’ गट यांनादेखील हाच अनुभव येणार आहे!