Home चंद्रपूर जो सतत वाचन करतो तो ज्ञान्यांमध्ये वस्ती करतो : डॉ.धनराज खानोरकर

जो सतत वाचन करतो तो ज्ञान्यांमध्ये वस्ती करतो : डॉ.धनराज खानोरकर

110

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.7जानेवारी):- मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे.भाषा जिवंत राहिली तरच आपली संस्कृती जिवंत राहते.मोबाईलवर कामापुरते बोला.आपला विकास आपल्या हाती आहे.जो वाचतो तो ज्ञान्यांमध्ये वस्ती करतो.”असे बहूमोल विचार प्रसिद्ध कवी- लेखक डॉ धनराज खानोरकरांनी व्यक्त केले.पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले,फक्त इंग्रजी म्हणजे प्रगती नाही,स्वतःच्या भाषेत विचार करण्याची ताकद ही खरी शैक्षणिक संपत्ती आहे,” असे विचार त्यांनी मांडले.अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो.

रोजचा प्रामाणिक अभ्यास, सातत्य आणि जिद्द यांच्याशिवाय यश मिळत नाही. आजच्या काळात मोबाईलच्या अति वापरावर भाष्य करताना त्यांनी, “मोबाईल तुमचा मित्र आहे, मालक नाही. मोबाईलवर नियंत्रण नसेल तर अभ्यास, आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व तिन्ही गोष्टी धोक्यात येतात,” असे परखड शब्दांत त्यांनी सांगितले.नेवजाबाई हितकारिणी शाळेत स्नेहसंमेलनानिमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

       या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव मा.अशोकजी भैया यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य प्रा. सुभाषजी बजाज हे होते.प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव मा. अँड.भास्करराव उराडे, पालक-शिक्षक समितीचे उपाध्यक्ष मा. विजयजी बनपूरकर उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. के. एम. नाईक सर, उपमुख्याध्यापक ए. डब्ल्यू. नाकाडे सर तसेच पर्यवेक्षक श्री. पी. आर. जीभकाटे सर यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली.

      कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने झाली.प्रास्ताविकात मुख्याध्यापक के. एम. नाईक सर यांनी स्नेहसंमेलनाचे शैक्षणिक, सांस्कृतिक व संस्कारमूल्य स्पष्ट केले. संस्थेचे सचिव श्री. अशोकजी भैया यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेची बांधिलकी अधोरेखित केली. अध्यक्षीय भाषणात प्रा. सुभाषजी बजाज सर यांनी प्रामाणिकपणा, सचोटी, जिद्द व नैतिक मूल्ये हीच विद्यार्थ्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणेश वंदना, सामूहिक नृत्ये व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर आनंदाने भारावून गेला.प्रा. डॉ. धनराज खानोरकर सर यांच्या प्रभावी, विनोदी व अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी नवी ऊर्जा निर्माण झाली असून कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला, अशी प्रतिक्रिया पालक व शिक्षकांनी व्यक्त केली.