Home नागपूर समतेसाठी झगडणारे निर्भीड लेखणीचे योद्धा डॉ. रणजीत मेश्राम काळाच्या पडद्याआड : प्रवीण...

समतेसाठी झगडणारे निर्भीड लेखणीचे योद्धा डॉ. रणजीत मेश्राम काळाच्या पडद्याआड : प्रवीण बागडे

113

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.5मार्च):-नागपूर येथील प्रखर, निर्भीड आणि तत्त्वनिष्ठ पत्रकार तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रणजीत मेश्राम यांच्या आकस्मिक निधनाने शहरासह सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने समाजाचे मोठे आणि अपूरणीय नुकसान झाले असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात नेहमीच सत्य, न्याय आणि समाजहिताच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. सत्तेच्या दबावाला वा कोणत्याही प्रलोभनाला न जुमानता त्यांनी निर्भीडपणे भूमिका मांडली. वंचित, शोषित आणि गरजू घटकांचा आवाज बनून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या लेखणीने अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि जनतेच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

      निशब्द करणारी ही दुःखद घटना, आदरांजली वाहण्याचंही धाडस होत नाही. समतेसाठी धगधगणारं वादळ आज शांत झालं. समाजाने आज एक सच्चा मानवतावादी, चळवळीचा निष्ठावान सिपाही गमावला. अत्यंत अभ्यासू विचारवंत, परखड वक्ते आणि क्रांतिकारी लेखणीचे धनी असलेले डॉ. रणजीत मेश्राम यांनी आयुष्यभर आपली लेखणी व्यवस्थेतील विसंगतींविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आणि सत्याच्या बाजूने निडरपणे चालवली. त्यांच्या विचारांत धार होती, शब्दांत ज्वाला होती आणि भूमिका नेहमीच ठाम व तत्त्वनिष्ठ असायची. त्यांनी पत्रकारिता केवळ व्यवसाय म्हणून नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून जगली. साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपल्या वैचारिक लेखनातून समाजमनाला विचार करायला भाग पाडले.

        वंचित, शोषित आणि उपेक्षितांच्या हक्कांसाठी त्यांनी अखंड लढा दिला. त्यांच्या लेखणीतून समाजजागृतीची मशाल प्रज्वलित झाली आणि अनेकांना लढण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही; ही समाजासाठी अत्यंत मोठी आणि न भरून निघणारी हानी आहे. पत्रकारितेबरोबरच समाजकार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी विविध उपक्रमांद्वारे जनजागृतीचे कार्य केले. त्यांच्या विचारांमुळे आणि कार्यपद्धतीमुळे त्यांनी पत्रकारितेत आणि साहित्यविश्वात स्वतंत्र व ठळक ओळख निर्माण केली.

         डॉ. रणजीत मेश्राम यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. या दुःखद प्रसंगी दिवंगत आत्म्यास साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात येत आहे की, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या परिवारियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना.