

(दि. 17 मे 2026 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भीमटेकडी, अमरावती येथे संपन्न होत असलेल्या चौथ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष प्रा.डॉ.अनंता सूर यांचे अध्यक्षीय भाषण वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.-संपादक )
सर्वांना सस्नेह जयभीम,
आज दि.१७ मे २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन,भीमटेकडी अमरावती येथे चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित होत आहे ही अतिशय आनंद आणि अभिमानाची बाब आहे.हे साहित्य संमेलन शब्दास्त्र विचार मंच, बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे स्मृतीदिन,स्मृतिशेष क्रांतिवीर सुखदेवराव तिडके स्मृतिदिन तसेच स्मृतिशेष सूर्यभानजी मेश्राम यांच्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात येत आहे याबद्दल मी आयोजकांना कोटी कोटी शुभेच्छा देतो.
आजच्या या साहित्य संमेलनाच्या उद्घाटिका आमच्या भगिनी मान.सुषमाताई पाखरे, स्वागताध्यक्ष डॉ.गोपीचंद मेश्राम सर,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रा.मुकुंद भारसाकळे सर, डॉ.वसंत शेंडे सर,प्रिय मित्र डॉ. भास्कर पाटील सर,डॉ.रविकांत महिंदकर सर,प्रा.अरुण बुंदेले सर, डॉ.विलास काळे सर आणि मुख्य संयोजक आयु.रमेशचंद्र कांबळे (बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट),आयु.प्रवीण कांबळे (शब्दास्त्र प्रमुख) तसेच संयोजक म्हणून यशस्वीपणे भूमिका पार पाडणारे टी.एफ. दहिवाडे सर,प्रा.देवानंद पाटील, अविनाशजी गोंडाने,पद्माकरजी मांडवधरे,चरणदासजी नंदागवळी, दिलीपजी शापामोहन आणि राजेश्वरीताई नंदागवळी तसेच आयोजन व स्वागत समितीतील सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो.
एकमेकांचे पाय ओढून मानवी प्रगतीला अडथळा निर्माण करू पाहणाऱ्या प्रवृत्ती सभोवताल कार्यरत असणाऱ्या काळात माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला आजच्या चौथ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिले याबद्दल आपले खूप खूप आभार !
बंधुनो,आपण एकविसाव्या शतकात जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि आजच्या या युगात राजकारणाच्या नावाखाली जाती-धर्माच्या आधारावर इथल्या सामान्य माणसाला पिचण्यासाठी नवनवीन आराखडे निर्माण केले जात आहेत अशा परिस्थितीत हे चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन या अमरावतीच्या मातीत संपन्न होत आहे ही निश्चितच गौरवाची बाब असली तरी या निमित्ताने काही जबाबदाऱ्याही आमच्या खांद्यावर येतात असे म्हणायला हरकत नाही.
हे आंबेडकरी विचारधारेचे आणि परिवर्तनालाच ध्येयध्यास मानणारे असे साहित्य संमेलन आहे.अर्थात जिथे जिथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव जोडलेले आहे त्या त्या सर्व घटकांशी परिवर्तनाचा संबंध येतोच हे आम्हाला मान्य करावेच लागेल. मग ते साहित्य असो, वर्णव्यवस्था असो,राजकारण असो की धर्मव्यवस्था असो.एकीकडे आम्ही स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी ओलांडली असली तरी खरोखरच आजही इथला तळागाळातील माणूस स्वतंत्र आहे का ? त्याच्या सर्वांगीण मूलभूत गरजांची पूर्तता झाली का? असा प्रश्न जसा मला पडतो तसा आपल्यालाही पडत असावा यात शंका नाही.
दारिद्र्याने पछाडलेल्या माणसांसाठी कित्येक युगानंतर बाबासाहेबांनी पहिला सामाजिक स्वातंत्र्याचा लढा या भूमीवर मोठ्या उर्जेने उभारला आणि आम्ही अंधारातून उजेडात जगायला लागलो.आता पुन्हा माणसाला गुलामीत जगायला भाग पाडणारी संस्कृती इथले मूठभर सत्ताधारी लोक राजकारणाच्या आधारावर निर्माण करू पाहत आहेत.परिणामी स्वातंत्र्यातही कला,साहित्य,विचार आणि तत्त्वज्ञान उरी बाळगून जगणाऱ्यांची अवस्था एखाद्या पिंजऱ्यातील पक्षांसारखी जायबंदी करण्यासाठी सत्याधाऱ्यांचा खटाटोप चाललेला आहे.यापासून आम्ही सावध झालो पाहिजे.तेव्हाच आम्हाला आपला सर्वांगीण विकास साध्य करता येईल.
मित्रांनो,२६ जानेवारी १९५० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान आमच्या हाती पडले आणि आम्ही प्रजासत्ताक देशाचे सार्वभौम नागरिक झालो.स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या सर्वोच्च्य मूल्यांना उराशी कवटाळून आकाशातील पाखरांसारखे जगायला शिकलो. म्हणजेच भारतीय संविधानाने आपल्याला कित्येक युगानंतर अभिव्यक्त होण्याची संधी दिली. परंतु बाबासाहेबांना संविधानाची निर्मिती करण्यापूर्वी किती शारीरिक आणि मानसिक यातना सहन कराव्या लागल्या असेल याचा आम्ही विचार केलाय का? बाबासाहेबांच्या सभोवताल असलेले महात्मा गांधी,पंडित जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल असे दिग्गज नेते प्रारंभी विरोधक होते.आपल्याला आठवत असेल तर खुद्द सरदार पटेल यांनीच संविधान लिहिण्यापूर्वी ” बाबासाहेबांना घटना समितीचे दरवाजे आणि खिडक्याच काय प्रत्यक्ष तावदानेसुद्धा बंद केली आहेत, पहायचे आहे आता,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कुठून आणि कसा प्रवेश करतात ते ? ” असे बाबासाहेबांविषयी तिटकार्याने उद्गार काढले होते.आणि शेवटी बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिल्यानंतर बाबासाहेबांची योग्यताही सरदार पटेल मान्य करतात.यावेळी एक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विरोधक सरदार पटेल यांना ” डॉ.आंबेडकर हे गांधीजींचे टीकाकार आणि काँग्रेस विरोधक असूनही त्यांची अध्यक्षपदी निवड का केली ? ” असा प्रश्न करतो तेव्हा ” तुम्हाला घटना निर्मितीबद्दल काय कळते. आम्हाला या कार्यासाठी डॉ. आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सापडणे शक्य नव्हते.आम्ही सर्वश्रेष्ठ व्यक्तीची निवड केली आहे ” असे स्वाभिमानाने सरदार पटेल उत्तर देतात.तरीसुद्धा इथल्या वर्णव्यवस्थेचा इतिहास इथेच संपत नाही.संविधान निर्मितीचे एवढे महान कार्य बाबासाहेबांशिवाय दुसरे कुणीच करू शकत नाही. तरीही त्यांच्या जातीचा उल्लेख करताना आचार्य करपात्रीजी महाराज जेव्हा ” आमची घटना अत्युत्तम आहे पण तिचा दोष एकच आहे की,ती एका अस्पृश्याने निर्मिलेली आहे ” असे निरर्थक उद्गार काढतात.त्यावेळी तो दोष महाराजांच्या वैचारिक बुद्धीचा म्हणावा की इथल्या वैदिक संस्कृतीने त्यांच्यावर लादलेल्या अपरिपक्व संस्काराचा म्हणावा हेच मला कळत नाही.एकीकडे सर्व मानवजात देवाची लेकरं आहेत म्हणून समाजाला तत्त्वज्ञान सांगत फिरायचे आणि दुसरीकडे एका अस्पृश्याने घटना लिहिली म्हणून भेदभावाची नीतिमूल्ये जपायची हीच का इथल्या साधुसंतांची खरी संतवाणी ? कुणी करावा अशांना शहाणपणाचा मौलिक उपदेश ? बाबासाहेबांनी अखिल मानव जातीच्या विकासासाठी अहोरात्र जागरण करून घटना लिहिली हे आम्ही पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे.
सध्याच्या स्थितीत भारतीय संविधानाला बदलविण्याची भाषा खुलेआम बोलली जात आहे.तर दुसरीकडे महाराजांचे सोंग पांघरून दैवी शक्तीच्या नावावर लुटण्याचा प्रकार समाजात कसा थैमान घालीत आहे हे तर आपण पाहिलेच आहे.अशोक खरातांसारख्या व्यक्ती अध्यात्माच्या नावावर कुणाकुणाचे आणि कशाकशा प्रकारे शोषण करतात आणि बेहिशोबी मालमत्ता जमा करतात हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आणि ऐकलेले आहे.असे खरात प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात इतकेच नव्हे तर खेडोपाडी विखुरलेले आहेत. जाती,धर्म आणि देवादिकांच्या नावावर सामान्यांना लुटण्यासाठी मठ,आश्रम उभी केलेली आहे.हा दोष त्यांचा नाही तर आम्हीच आपल्या विवेकबुद्धीला विकून त्यांच्या आहारी जातो म्हणून ते बलाढ्य होतात.शिवाय इथले काही सत्ताधारीही त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांना अलिकडे कायद्याची भीतीच राहिलेली नाही. संविधानातील बाबासाहेबांनी सांगितलेल्या स्वातंत्र्याचा आम्हाला खरंच हा अर्थ अपेक्षित आहे का ? ज्या भारतीय संविधानाचा गौरव संपूर्ण जगाने केला ते संविधान एकाधिकारशाही किंवा भांडवलशाहीचा प्रखरपणे विरोध करते.समाजवादी लोकशाहीचा पुरस्कार करून प्रत्येक नागरिकाला प्रकट होण्याचा नैतिक अधिकार देते.परंतु आज संविधानाच्या मानवतावादी,समतावादी आणि स्वातंत्र्यवादी मूल्यांना या देशातील वर्णव्यवस्थेचे भाट जाळून टाकत आहेत आणि पुन्हा इथे मनुची प्राचीन व्यवस्था जन्माला घालण्याच्या प्रयत्नात आहे.ही बाब या देशाच्या सार्वभौम लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.म्हणूनच इथे बसलेल्या प्रत्येक कलावंताने आता सावध होऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण आपल्याला संविधानाने दिलेले निर्भर स्वातंत्र्य आज धोक्यात आलेले आहे. हा धोका आम्हाला कुण्या विदेशीयांपासून नाही तर इथल्याच मूठभर मनुवाद्यांपासून आहे.
सत्तेतील काही राजकारणी सुशिक्षितांना तर भोंदूबाबा अशिक्षितांना किंवा बुद्धी असूनही बुद्धीहीनांसारखे वागणाऱ्यांना लुबाडीत आहेत.संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तथाकथित दत्तधाम दरबार चालवणारे भोंदू राजेंद्र गडगे महाराज मंत्राने कॅन्सर बरा करण्याची भाषा बोलतात. आणि मी आत्मज्ञानी असल्याने आपल्याला डायरेक्ट लिव्हरमधील इन्फेक्शन दिसल्याचे सांगतात. दत्तधामच्या नावावर भोळ्या जनतेला अंधश्रद्धेच्या खाईत लोटायचे आणि आपली ‘अर्थ’पूर्ण पोळी भाजून घ्यायची हे कुठले परिवर्तनवादी विचार ? जर मंत्रातंत्राने कॅन्सर बरा होत असेल तर एम.बी.बी.एस करून डॉक्टर होण्याची गरजच काय ? आम्हाला आता विज्ञानाकडून अध्यात्माकडे जाण्याची गरज आहे की अध्यात्माकडून विज्ञानाकडे जाण्याची गरज आहे ? हेही एकदा आम्ही तपासून पहायला हवे.आता किशोर महाराज शिवनीकर उर्फ पिस्तुल्या महाराजांचीही कहाणी यापेक्षा फार काही वेगळी नाही.आता वारकरी संप्रदायामध्ये मागील सातशे वर्षात पिस्तूल बाळगून समाजजागृती करणारे संत आम्हाला पाहायला मिळाले नव्हते.ती उणिवही या महाराजांनी भरून काढली.
ज्ञानोबा आणि तुकोबांनी समाजजागृती करण्यासाठी पिस्तूल हाती घेतल्याचे कधीच आमच्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आले नाही.मग कुठे आणून ठेवलाय आम्ही संतांचा महाराष्ट्र ? पण आता असे ढोंगी महाराज वारकरी संप्रदायालाही बुडवायला निघालेत. समाज प्रबोधनाच्या नावावर गुंडगिरी करून बेहिशोबी कोट्यावधीची मालमत्ता जमा करतात. ” जय हिंदू राष्ट्र,जय श्रीराम ” म्हणत सामान्य लोकांच्या भावनेशी खेळणारे आणि वेळ आलीच तर ” चंद्रशेखर आजादांसारखे स्वतःला गोळी मारून घेईल ” असे म्हणणारे ढोंगी महाराज समाजाला काय जागृत करणार ? आज आपल्या देशात समाज जागृतीच्या नावाखाली माणुसकीचे जे काही हनन चाललेय ते बाबासाहेबांना अपेक्षित होते का? बरं सरकारही डोळे मिटून घेतल्यागत या साऱ्या घटनांकडे मूकपणे पहात असेल तर कसा होईल समाज,माणूस आणि देशाचा विकास ? ज्या देशात दिवसाढवळ्या स्त्रियांवर अत्याचार होऊनही पोलीस यंत्रणा गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात विलंब करते.ज्या देशात जितू मुंडा नावाच्या एका सामान्य माणसाला केवायसी करण्यासाठी आपल्या भगिनीचे प्रेत दिवसाढवळ्या खांद्यावर घेऊन बँकेमध्ये पायी पायी जावे लागते,जिथे राजकारणातील पदाचा आधार घेऊन ‘शिवाजी कोण होता ?’ या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाला शिवाजी’ या शब्दाचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल रात्री प्रकाशक प्रशांत आम्ही यांना आई, पत्नीच्या नावाने शिव्याची लाखोळी वाहिली जाते.पोटात तलवार खुपसून पानसरे करण्याची भाषा वापरली जाते.तरीही आमदार साहेबांवर कारवाई करण्यास पोलीस यंत्रणा पुढे येत नाही.मग आमच्या देशात लोकशाही सुखाने नांदते आहे असे तरी आम्ही कसे म्हणायचे ? म्हणजेच सत्ता,पद,प्रतिष्ठा, मानसन्मान आणि व्यक्ती पाहून कायदा माणसामाणसात भेदभावाची दरी निर्माण करतो की काय ? असे प्रश्न आम्हाला पडायला लागलेत.अशावेळी दहशतीखाली वावरणाऱ्या प्रशांत आंबी आणि त्यांच्या कुटुंबाच्या बाजूने कोण बोलणार ? कोण उभे राहून लढणार ? याचाही विचार व्हायला हवा.नेत्यांच्या घरासमोर अन्यायाविरुद्ध मोर्चे काढले की पोलीस यंत्रणेद्वारे लाठीमार करून त्यांना जखमी केले जाते.एकेकाला पकडून तुरुंगात किंवा दवाखान्यात पाठवले जाते.हे खरे तर न्यायाच्या विरोधात अन्यायाचा विजय झाल्यासारखेच आहे.जखम पोटाला आणि मलम ओठाला लावल्यासारखा हा सारा प्रकार आमच्या देशात बेमुर्वतपणे सुरू आहे.आणि याविरोधात पुढे येऊन ठामपणे भूमिका मांडण्यासाठी राजकारणी एकत्र येत नाहीत. लोकशाहीला हुकुमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मित्रांनो,अलीकडे तर आमच्या इतिहासालाही विद्रूप करण्याचा प्रकार आता मुद्दामपणे केला जात आहे.सांगायचेच झाले तर धीरेंद्र कृष्ण महाराज अर्थात बागेश्वर धामवाले बाबा शिवाजी महाराजांविषयीचा नवीन इतिहास सांगण्यात मागे राहिले नाहीत.ते तर शिवाजी महाराज युद्धातून परतल्यानंतर रामदास स्वामींना भेटल्याचा आणि थकल्यामुळे त्यांना शासन सांभाळण्यासाठी देण्याचाच उल्लेख करतात.आता खरोखरच शिवाजी महाराज लढाया करून करून थकले असतील काय ? आणि रयतेच्या सेवेचे प्रतिक म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवबांच्या मनात जबाबदारीतून मोकळे होण्याचा विचारही आला असेल काय ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात.दिलीप महाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा काही संबंध नसल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याचं सांगितलं.त्यात त्यांनी “रामदासांची आदिलशहास अर्जी ” नावाचे पत्र असून त्याचा स्पष्ट अनुवाद आणि संदर्भही दिलेला आहे.त्याची *मूळ ओवी*: पायाचा मी दास / शाह अर्जी ऐकावी // ( मी तुमच्या पायाचा एक तुच्छ दास आहे. बादशहाने माझी ही विनंती ऐकून घ्यावी) *मूळ ओवी*: शिवाजीच्या राज्याची धुळधान व्हावी //(शिवाजीच्या राज्याचा पूर्णपणे विनाश व्हावा.ती धुळीस मिळावी) *मूळ ओवी*: दरबार आपूला आदिलशाही/हीच माझी काशी//(तुमचा आदिलशाई दरबारच माझ्यासाठी काशीक्षेत्र अर्थात पवित्र स्थान आहे) या ऐतिहासिक दस्तावेजात संत रामदासांनी आदिलशहाकडे शिवाजीच्या राज्याचा विनाश करण्याची विनंती केली आहे.स्वतःला अत्यंत नम्रपणे आदिलशहाचे दास आणि त्यांच्या दरबाराला काशीप्रमाणे पवित्र मानले आहे.आता अशा समर्थ रामदास स्वामींना शिवाजी महाराज खरोखरच “आता मी युद्ध करून थकलो आहे आणि स्वराज्य तुम्ही सांभाळा ” असे म्हणण्याची हिंमत करतील काय ? आणि समर्थ रामदास स्वामी शिवरायांचा राज्यकारभार समर्थपणे बसल्या जागेवरूनच सांभाळू शकेल काय ? हा संशोधनाचा विषय आहे.परंतु कुठेतरी जाती,धर्म,बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या नावावर इतिहासाचे खोटे दाखले देऊन बेताल वक्तव्य करण्याची स्पर्धा सुरू आहे.त्यांना आता कुणाचाही भीती बाळगण्याचे कारण राहिलेले नाही.खोटे बोलूनही ते खरे असल्याचा दावा करण्यात तरबेज झाले आहेत.आणि आम्ही सत्यापासून पळवाट काढीत आहोत.आता आम्हाला असे शांत बसून चालणार नाही.आम्ही शांत बसणे म्हणजे ते शिरजोर होणे होय हे गणित आम्ही समजून घेतले पाहिजे.
मित्रांनो,बाबासाहेबांना अपेक्षित असलेले समग्र परिवर्तन हे मानवाच्या जीवनात अंधश्रद्धा आणि गुलामगिरी निर्माण करून सामान्यांना लुटण्यासाठी होते का ? नक्कीच नाही,आज आम्ही आमच्या देशात जागतिकीकरणाचे युग आले म्हणून वाहवा मिरवतो. परंतु हे जागतिकीकरण कोणत्या स्वरूपाचे आहे ? केवळ दळणवळणाची साधने वाढली, यंत्रांचे साम्राज्य वाढले आणि माणूस स्मार्टफोनच्या दुनियेत वावरल्याने जागतिकीकरण होते काय ? या देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊ म्हणणारे राजकारणातील नेते तरी शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या सामान्य गोरगरिबांचे प्रश्न स्वातंत्र्यानंतरही इतक्या वर्षात दूर करू शकले काय ? दररोज या देशाच्या कोणत्या ना कोणत्या तरी कोपऱ्यात स्त्रीवर बलात्कार होऊन तिचा बळी घेतला जातो.आणि आम्ही हे सारं उघड्या डोळ्यांनी ऐकतो,पाहतो पण याला आळा कोण आणि कधी घालणार? आज बेरोजगारी वाढल्याने गुंडप्रवृत्ती वाढीस लागल्या.उच्च शिक्षण घेऊनही शासन सुशिक्षितांना नोकऱ्या द्यायला तयार नाही.आरक्षणाचा मुद्दा समोर आणून साऱ्या पिढीचा खेळखंडोबा आणि खच्चीकरण करणे चालले आहे.याला जबाबदार कोण ? सर्व पातळ्यांवर शासनाकडून नव्या पिढीची गळचेपी चालली आहे.
आजही आमच्या देशात पारधी, कैकाडी,बहुरूपी,गारुडी,वैदू , वडार,कोल्हाटी,गोसावी,घिसाडी,चित्रकथी,गोंधळी,पांगुळ,वासुदेव,माकडवाले,नंदीवाले,बेरड,रामोशी अशा अनेक जाती आणि जमातीचे भटके लोक राहतात.त्यांच्या कित्येक पिढ्या भटकण्यात बरबाद झाल्या.तरीही या भटक्या लोकांची पायपीट शासनाच्या कोणत्याही योजना पाहिजे त्या प्रमाणात अजूनही थांबवू शकल्या नाही. त्यांना राहण्यास सरकारने हक्काची पक्की घरे अजूनही बांधून दिलेली नाही.या देशातील मोठमोठे कारखाने आणि सत्तेतील पदे कुणाच्या हाती आहेत ? केवळ माणूस विदेशात फिरून आल्याने जागतिकीकरण झाले असे म्हणता येणार नाही.तर इथल्या तळागाळातील लोकांच्या डोळ्यातील अश्रूंना जोपर्यंत न्याय देऊन समतेच्या पातळीवर आणले जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जागतिकीकरण आले असे म्हणता येणार नाही.बहुसंख्य लोक आज आपल्या मूलभूत गरजांपासूनही कोसो दूर आहेत आणि आज आम्ही चंद्रावर घर बांधण्याची स्वप्नं उराशी गोंजारीत असू तर त्याला अर्थ नाही.सगळीकडे आज जागतिकीकरणाच्या नावावर लुटालूट,स्वैराचार आणि चंगळवादाचे बिजारोपण करणे सुरू आहे.जिथे शेकडो लोकांच्या पोटाचे प्रश्न सुटत नसेल तिथे जागतिकीकरण काय कामाचे ? राजकारणीही जनसामान्यांपासून चार हात हटकूनच वागतात.पद, सत्ता आणि खुर्चीच्या सभोवताल फिरण्यात ते मश्गूल आहेत.अशा धकाधकीच्या काळात आज आम्ही जगतो आहोत.अशावेळी आम्हाला सन्मानाने पुढे होऊन जगण्यासाठी बाबासाहेबांचे विचार,जीवनसंघर्ष आणि साहित्यच कारणीभूत ठरेल यात शंका नाही.
आज मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण होत आहे.त्यातही आनंदाची बाब म्हणजे तळागाळातून संघर्ष करून पुढे आलेला लेखकच बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी विचारांचा वारसा साहित्यातून सकसपणे मांडतो आहे.माणूस हाच केंद्रबिंदू मानून साहित्यिक शेतकरी,कामगार आणि जनसामान्यांच्या व्यथा, वेदनांना शब्दांकित करीत आहेत. त्यामुळे अशाच कालपर्यंत गरिबीने होरपळल्या गेलेल्या आणि अत्याचारामुळे भाजल्या गेलेल्या या आमच्या देशाला जगासमोर आणण्यासाठी लेखकाने आज पुढे येण्याची गरज आहे.इथे माझ्या नजरेसमोर बसलेल्या प्रत्येकाच्या अंगी साहित्य निर्माण करण्याची ताकद आहे.प्रत्येकाचे जीवन म्हणजेच एक कादंबरी आहे.आता आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार होऊ शकतो ही जाणीव जोपर्यंत आपल्या अंगी निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या हातून सकस साहित्याची निर्मिती होणार नाही.त्यामुळे बाबासाहेबांना आपले प्रेरणास्त्रोत मानून त्यांचे विचार मनात नव्हे तर जनातही रुजविण्याचा प्रयत्न करायला हवा. जीवनात प्रयोजन घेऊन प्रयत्न करीत जगणारी माणसेच प्रसिद्धीच्या डोंगरापर्यंत पोहोचत असतात हे आपण बाबासाहेब यांच्या प्रतिमेला नजरेसमोर आणून लक्षात ठेवले पाहिजे आणि त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे.
मित्रांनो,बाबासाहेब नाव नसून समग्र परिवर्तनाचा विचार आहे ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे.बाबासाहेबांनी केलेले परिवर्तन केवळ एका जाती- धर्मापूरते किंवा वर्गापूरते मर्यादित नाही तर त्यामध्ये अखिल मानव समाजाचा आणि विश्वाचा कल्याणकारी मार्ग आहे.या बाबासाहेबांच्या प्रेरक विचारातून प्रकटलेल्या आंबेडकरी साहित्यात माणसाचे मन,मेंदू आणि मनगट घडविण्याचे सामर्थ्य आहे.इतकेच नव्हे तर हे साहित्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचे मूल्यही प्रदान करते.पुस्तक माणसाचे मस्तक घडवते आणि ज्यांचे मस्तक सशक्त असते ते कुणापुढेही झुकत नाही.म्हणूनच साहित्याचे अर्थात ग्रंथांचे बौद्धिक महत्त्व जाणून बाबासाहेबांनी राजगृहची निर्मिती केली.जगातील कुठल्याही विचारवंताच्या घरात जेवढे ग्रंथ नसतील तेवढी ग्रंथसंपदा बाबासाहेबांनी गोळा केली.त्यांनी उपासतापास सहन करून केवळ ग्रंथच विकत घेतले नाही तर रात्रंदिवस या ग्रंथांचे वाचन,चिंतन, मनन करून ग्रंथ लेखनही केले.बहिष्कृत भारतातील अग्रलेख आणि जनतासारखी वृत्तपत्रे चालवून अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासोबतच तळागाळातील माणसांच्या मेंदूलाही वैचारिक खाद्य पुरविण्याचे मौलिक कार्य केले.
अस्पृश्यांचे प्रश्न कोणत्याही स्थितीत सोडविणे हा बाबासाहेबांच्या आयुष्याचा ध्येयध्यास होता.अधिकारांपासून वंचित राहिलेले आपल्या लाखो करोडो बांधवांना लागलेला युगानुयुगाचा कलंक बाबासाहेबांना धुवून काढायचा होता.म्हणूनच ९ मार्च १९२७ रोजी मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झालेल्या समाजसेवकांच्या बैठकीत ते म्हणतात,” अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत.ते सर्व मी सोडवू शकणार नाही याची मला जाणीव आहे.परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधून घेऊ शकेल एवढा मला आत्मविश्वास आहे. अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे.या हिमालयाची टक्कर मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे.हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील हे तुम्ही लक्षात ठेवा ” या बाबासाहेबांच्या भाषणातील विधानाला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होतील.परंतु आजही अस्पृश्य म्हणून समजल्या जाणाऱ्या आमच्या बांधवांचे प्रश्न इथल्या भ्रष्ट राजकारण्यांनी सोडवले काय ? आणि बाबासाहेबांसारखे नि:स्वार्थ मनाने समाजाच्या विकासासाठी झपाटलेले,तळमळीने पुढे येणारे पुढारी तरी किती राहिले ? बोटावर मोजण्याइतकेही सापडेल की नाही याची मला शंकाच आहे.याला जबाबदारही आम्हीच आहोत. निवडणुकीच्या वेळी आमच्या वार्डात,घरोघरी येऊन ते पैसा आणि दारूची खैरात करतात.आणि आमच्यातीलच काही डोळे असूनही आंधळेपणाची भूमिका स्वीकारून विकले जातात. मग आमच्या पुढ्यात असे दलाली करणारे नेतृत्व आल्यावर कशी होणार आमची प्रगती ? उत्तम नेतृत्वाची प्रामाणिक माणसेही अशा अर्थव्यवस्थेच्या पसाऱ्यात विनाकारण भरडली जाऊन व्यवस्थेच्या बाहेर फेकली जातात हेच खरे ! ठिकठिकाणी जर अत्याचार हाच शिष्टाचार होऊन बसला असेल तर या देशाचे भवितव्य कोण आणि कसे घडवणार ?
मित्रांनो,बाबासाहेबांचे विचार आणि साहित्य शिरोधार्य मानून आज आपण तळागाळातून आलेली माणसं लेखन करीत आहोत.एका अर्थाने आपण आंबेडकरवादी साहित्याचे निष्ठावान वारसदार आहोत.आपलं साहित्य या प्रज्ञासूर्याच्या प्रकाशाने गडद अंधारातून आज जगाच्या चारही दिशांमध्ये उजेडाच्या किरणांसारखे झेपावत आहे.कारण आपण कालची अमावस्या नाकारून आजची पौर्णिमा स्वीकारलेली आहे.त्यामुळे आपला लढा चंद्रासमान दिसणाऱ्या भाकरीचा तर आहेतच पण त्याचबरोबर जगात शांतीचा, करुणेचा,समतेचा आणि मानवी स्वातंत्र्याचा संदेश देणाराही आहे.त्यामुळे आमच्या साहित्यातून तथागत गौतम बुद्ध,महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज,गोपाळ गणेश आगरकर,सावित्रीबाई फुले,संत गाडगे बाबा यांच्या विचारांचा वारसा दिसायला हवा.आंबेडकरवादी साहित्याने जगाच्या पाठीवर पहिल्यांदा नाव करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे हे विसरता कामा नये.म्हणूनच भविष्यात आम्ही आपल्या लेखण्या या अंगाने झिजविण्यासाठी तत्पर असायला हवे.कारण आज जसा आहे तसाच उद्याचा काळही आंबेडकरवादी विचारांच्या साहित्य निर्मितीचा राहील याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही आणि तुमच्याही मनात असू नये असे मला वाटते.
मित्रांनो,तथागत गौतम बुद्धाच्या काळात आपण आचार आणि विचाराने गर्भश्रीमंत बनलो होतो.बौद्ध राजाच्या काळात आपण पृथ्वीच्या तळातून सोन्याचा धूर काढत होतो.आणि आजही बुद्धाच्या विचारानेच आपण जगात विश्वशांती आणि विश्वसत्ता निर्माण करू शकतो.हीच तथागत बुद्धाची विचारधारा अडीच हजार वर्षानंतर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या ओंजळीत टाकली.त्यामुळे ती केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील आमच्या वाट्याला आलेली सुवर्णयुगाची मोठी देणगी आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी बौद्ध धम्म आपल्याला दिला आणि आम्ही आपल्या घरी जाताच घरातील देव,पुराण,पोथ्या नदीच्या गढूळ पाण्यात कायमच्या फेकून दिल्या. चीन आणि जपानची प्रगती जशी बौद्ध विचाराने झाली तशी भविष्यात भारताचीही होईल यात शंका नाही.बुद्धाचा विचार जसा विश्व कुटुंबवादाचा होता तसाच मानवाच्या सर्वांगीण विकासाचा होता.त्यामुळेच आईन्स्टाईनसारखे अनेक थोर विचारवंत,शास्त्रज्ञ आणि तत्ववेत्तेही बुद्धाच्या प्रगल्भ विचारांनी प्रभावित होऊन गेले. आता बाबासाहेबांनी आमच्यासमोर जे बुद्धाचे तत्त्वज्ञान ठेवले त्यावरून आम्हाला आपल्या भविष्याची वाटचाल केल्याशिवाय पर्याय नाही. शेवटी वामनदादांच्या शब्दात मी एवढेच म्हणेन-
उद्धरली कोटी कुळे/
भीमा तुझ्या जन्मामुळे
जखडबंद पायातील
साखळदंड तटातटा तुटले
तू ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे/
भीमा तुझ्या जन्मामुळे
या बाबासाहेबांच्या क्रांतिकारी कर्तुत्वाची जाण उरात ठेवून आम्ही आपल्या आयुष्याची वाट सुकर करायला हवी.खरे तर आजच्या स्थितीगतीवर आणि बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या कर्तुत्वावर सांगायलाही वेळ कमी पडेल असा हा प्रसंग आहे.असो, या अमरावती शहराच्या पावन मातीत स्मृतीशेष क्रांतिवीर सुखदेवराव तिडकेंसारखे व्यक्तिमत्व बाबासाहेबांच्या क्रांतिकारी प्रेरणेतून उभे झाले. १९५२ ला बाबासाहेब भंडाऱ्यामधून लोकसभा निवडणुकीला उभे असताना सुखदेवरावांनी प्रचारात सहभाग घेतला.याच दरम्यान महिमापूरच्या विहिरीचा सत्याग्रह,सांगळूद प्रकरण,दारापूर येथील गुंडानी मागासवर्गीय महिलांवर अत्याचार केलेला असताना त्यांच्या विरोधात आंदोलन छेडणारे सुखदेवराव हे बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विश्वासातील एक अग्रगण्य नाव होते.
त्यामुळे मी स्मृतिशेष क्रांतिवीर सुखदेवराव तिडके आणि स्मृतीशेष सूर्यभानजी मेश्राम यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो आणि जाता जाता शेवटी आपल्यासारख्या महामानवाच्या विचारांची वाट चालणाऱ्या आयु. रमेशचंद्र कांबळे सर आणि आयु.प्रवीण कांबळे या सृजनशील आयोजकांनी मला चौथे परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची संधी दिली आणि माझे अध्यक्षीय भाषणरुपी विचार या संमेलनाच्या निमित्ताने ऐकून घेतले.त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. जयभीम. जय भारत. जय महाराष्ट्र.







