

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.5जानेवारी):- कारधा केंद्रातंर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अंगणवाडी केंद्र १ व २ यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खमारी बुटी च्या आवारात मोठ्या उत्साह नुकतीच साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य किशोर ठवकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, खमारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गिता मोटघरे, अंगणवाडी सेविका चंदा मडामे, ज्योती रेहपाडे व शिक्षक -शिक्षिका, विद्यार्थिनी – विद्यार्थी उपस्थित उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
उपस्थित मान्यवर महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चारित्र्यावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. त्या काळातील रूढी, अंधश्रद्धा आणि विरोध असूनही त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या, विधवा -पुनर्विवाहाला पाठिंबा दिला आणि अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवला. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल हे धाडसाचे आणि समाजहिताचे होते. भारताच्या सामाजिक इतिहासात शिक्षण, समानता आणि स्त्री-मुक्तीच्या चळवळीला दिशा देणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या कार्यातून मिळालेले मूल्य व विचारांचा स्वीकार करून कृतीत उतरवणे हीच खरी आदरांजली ठरेल अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गभणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अंगणवाडी सेविका चंदा मडामे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुनिता भांबोरे, केशव लेदे, कांचन खोब्रागडे, अमृता करनायके, अंगणवाडी मदतनीस नंदा सार्वे, यामिनी अहिरकर, अस्मिता तांडेकर, पंचफुला मोहतुरे, स्वरा मारवाडे, प्रथमेश मेश्राम, श्रेष्ठ समरित, प्रज्ञा मेश्राम व शिक्षक -शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहकार्य केले.







