

▪️समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राष्ट्रीय आयकॉन पुरस्कार
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
भंडारा(दि.15जानेवारी):-केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली – महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संविधान दिन, जागतिक मानवाधिकार दिन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृह, भंडारा येथे भव्य संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘संविधान सन्मान स्पर्धा परीक्षा – २०२५’ मध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, सन्मानपत्रे तसेच भारतीय संविधानाची प्रत देऊन गौरविण्यात आले.
राज्यस्तरावर मृणाली गणेश रामटेके व त्रिशा राजेंद्र कातोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर अर्थ सुभाष नागदिवे व चांदनी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. याशिवाय शिवांग मौर्या, रमानी रंगारी, प्राची मरसकोल्हे, खुशबू बोरकर, सोनाक्षी निकुळे, मयंक कावळे, रोहिणी पडोळे, पियुष खेत्रे, फालगुनी पात्रे व श्रेया मरखडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेत भंडारा जिल्ह्यासह परिसरातील अनेक शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधान व मानवाधिकारांविषयी जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
याच प्रसंगी समाजात निर्भीडपणे व सातत्याने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय गौरव आयकॉन पुरस्कार – २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानित सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये भिक्षुणी संघप्रिया महाथेरी, प्रा. प्रियदर्शन सोनटक्के, प्रविण भोंदे, सोमदेव चोपकर, सोपान रंगारी, श्रीकृष्ण देशभ्रतार, उत्तम मेश्राम, भाऊ कातोरे, मंगेश हुमणे, ॲड. विजयकुमार कस्तुरे, बबन महामुने, डॉ. खरात, संजय बांगर, अखिलेश गोंडाणे व शिलानंद नंदागवळी यांचा समावेश होता.
केंद्रीय मानवाधिकार संघटनामार्फत मरणोपरांत देहदानाबाबत समाजात सातत्याने जनजागृती केली जात आहे. याच अनुषंगाने संघटनेच्या पदाधिकारी सौ. मालाताई समुद्रेकर यांनी मरणोपरांत देहदानाची घोषणा करून विधिवत प्रक्रिया पूर्ण केली. याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यापूर्वी नागरतन रंगारी व प्रदीप घाडगे यांनीही मरणोपरांत देहदान केले आहे. या सामाजिक कार्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी सातत्याने जनजागृती करीत आहेत.
या कार्यक्रमास केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, जिल्हा सरकारी वकील ॲड. विनोद भोले, भंडारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन रहांगडाले, कार्यकारी अभियंता श्री. व्ही. एस. चुरहे, सौ. निता मुन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाचे महत्त्व, मानवाधिकारांचे संरक्षण तसेच समाजहितासाठी कार्य करण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देवानंद नंदागवळी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रो. शीलवंतकुमार मडामे यांनी केले.
या यशस्वी आयोजनासाठी केंद्रीय मानवाधिकार संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.







