Home महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माढ्यात शिंदे बंधूंकडे नेतृत्व देऊ नये यासाठी भाजप...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माढ्यात शिंदे बंधूंकडे नेतृत्व देऊ नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांची थेट प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार

79

✒️नागेश खुपसे-पाटील(सोलापूर,जिल्हा प्रतिनिधी)

सोलापूर(दि.14जानेवारी):-माढा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीत मोठी खळबळ उडाली असून, कुर्डुवाडी नगरपंचायत निवडणुकीपासून ते विविध आर्थिक व्यवहारांपर्यंत गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत भाजपचे सक्रिय सदस्य समाधान बबन केचे यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.

सदर तक्रारीत माढा तालुका माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे व विक्रम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू नयेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, कुर्डुवाडी नगरपंचायत निवडणुकीदरम्यान रणजित शिंदे हे पक्षविरोधी कारवायांमध्ये सक्रिय होते. त्यांच्या भूमिकेमुळे भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही, असा देखील गंभीर आरोप करण्यात आला आहे.

तसेच लेखी तक्रारीत रणजित शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर तसेच मयत व्यक्तींच्या नावावर बेकायदेशीर कर्ज काढणे, शासनाच्या कर्जमाफी योजनेचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणे, बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून ओटीएस प्रकरणे मंजूर करून हजारो शेतकऱ्यांचे सिबिल खराब करणे, असे आरोप नमूद करण्यात आले आहेत.

तक्रारीनुसार, काही प्रकरणांमध्ये संबंधित शेतकऱ्यांनी रणजित शिंदे यांच्यावर ४२० अंतर्गत गुन्हे दाखल केल्याचेही नमूद आहे. तसेच ईडीमार्फत संबंधित नातेवाईक व व्यावसायिकांवर कारवाई सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

माढा शहरातील मागासवर्गीयांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सुतगिरणी व बँक संस्थांबाबतही गैरव्यवहार झाल्याचे आरोप तक्रारीत आहेत. शासनाची मान्यता नसताना जमीन कवडीमोल दराने बळकावल्याचा तसेच जिल्हा दूध संघाच्या मालमत्तांचा लिलाव प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात, पीडब्ल्यूडी विश्रामगृहाशेजारी तसेच विविध शासकीय जागांवर कवडीमोल भाड्याने खासगी व्यवसाय उभारल्याचे, तसेच निमगाव येथील शासकीय साठवण तलाव बुजवून खासगी बंगला उभारल्याचे आरोप तक्रारीत नमूद आहेत.

अशा व्यक्तींच्या नेतृत्वाखाली पक्षाने निवडणुका लढवू नयेत तसेच त्यांच्या निकटवर्तीयांना उमेदवारी देऊ नये, अशी आग्रहाची मागणी माढा तालुक्यातील भाजप सक्रिय कार्यकर्ते समाधान बबन केचे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार केली आहे.

संबंधित तक्रारीमुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पक्ष नेतृत्व यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.