

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.26जानेवारी):- शहरातील जयश्री दूध एजन्सीला दि.२४ जानेवारी शनिवार रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत दूध एजन्सीतील संपूर्ण साहित्य,फ्रीज,डीप फ्रीझर,विद्युत उपकरणे,दूध व दुग्धजन्य पदार्थ, पाव, खारी,टोस्ट,तसेच इतर महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले असून,या आगीत अंदाजे पंचवीस लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दल व पोलिसांना घटनेची माहिती दिली.गंगाखेड नगर परिषद अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण एजन्सी आगीच्या विळख्यात सापडली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली,त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र जयश्री दूध एजन्सीचे मालक मंचकराव शिंदे व कुटुंबीय यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून,या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आग लागल्याच्या वेळी एजन्सी बंद अवस्थेत असल्याने मोठी जीवितहानी टळली,घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून,आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याची प्राथमिक माहिती असली तरी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून,विद्युत वायरिंगची वेळोवेळी तपासणी करणे तसेच आवश्यक सुरक्षेची उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







