Home चंद्रपूर ओबीसी खासदारांचे मौन संशयास्पद! जातीनिहाय जनगणनेत OBC साठी कॉलम नाही – श्रीहरी...

ओबीसी खासदारांचे मौन संशयास्पद! जातीनिहाय जनगणनेत OBC साठी कॉलम नाही – श्रीहरी सातपुते यांचा थेट हल्ला

79

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.4एप्रिल):-  देशात १ एप्रिलपासून सुरू झालेल्या जातीनिहाय जनगणनेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. OBC समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याची बाब समोर आल्यानंतर राष्ट्रीय OBC युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सातपुते यांनी सत्ताधारी OBC खासदारांवर थेट आणि धारदार टीका केली आहे. ज्या खासदारांना OBC समाजाने निवडून दिलं, तेच आज त्यांच्या हक्कांच्या मुद्द्यावर गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, OBC साठी स्वतंत्र नोंदणी नसलेली जनगणना ही समाजाच्या अस्तित्वालाच नाकारणारी असून, अशा अपुऱ्या प्रक्रियेतून सामाजिक न्याय मिळू शकत नाही.

         सातपुते यांनी पुढे सांगितले की, OBC समाजाची अचूक लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी स्वतंत्र कॉलम अत्यावश्यक आहे. जर जनगणनेतच स्पष्ट नोंद नसेल, तर भविष्यातील आरक्षण, योजना आणि धोरणे कोणत्या आधारावर ठरवली जाणार, हा गंभीर प्रश्न आहे. सत्ताधारी प्रतिनिधींनी संसदेत यावर ठाम भूमिका न घेणे ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. ही केवळ आकडेवारीची बाब नसून OBC समाजाच्या अधिकार आणि न्यायाची लढाई आहे, असे स्पष्ट करत त्यांनी सरकारने तातडीने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.