

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.8एप्रिल):-इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU – Indira Gandhi National Open University) नवी दिल्लीतील मुख्यालयात 7 एप्रिल रोजी विद्यापीठाचा 39 वा दीक्षांत समारंभ पार पाडला. या संमारंभात विद्यापीठाच्या जगभरातील 3,24,835 विद्यार्थ्यांना विविध पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या.
या दीक्षांत समारंभाला देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिक्षांतीय भाषण केले, तर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. उमा कांजीलाल यांनी विद्यापीठाशी संबंधीत अहवालाचे सादरीकरण केले. हा दीक्षांत समारंभ नागपूरसह 55 विभागीय केंद्रांवर एकाच वेळी आयोजित करण्यात आला होता. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) नागपूर विभागीय केंद्राचा सोहळा नागपूरमधील सिव्हिल लाइन्स इथल्या हिस्लॉप महाविद्यालयाच्या शालोम सभागृहात संपन्न झाला.
भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) नागपूर इथल्या संकुलाचे संचालक डॉ. भीमराया मेत्री हे नागपूर इथल्या समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विभागीय दीक्षांतीय भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच समाजाच्या विकासात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने दिलेले योगदान अधोरेखित केले. या विद्यापीठाद्वारे उपलब्ध करून दिल्या गेलेल्या अभ्यासक्रमांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना होत असलेल्या लाभांविषयी दखलपूर्ण मांडणी त्यांनी आपल्या भाषणातून केली. भारत आता एक जागतिक ब्रँड म्हणून उदयाला येत असून, 2026-27 पर्यंत भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादन 5 ट्रिलियन अमेरिकी डॉलरचा टप्पा ओलांडेल, असे ते म्हणाले. जो कल्पनेपलिकडचा विचार करतो, अशक्य साध्य करतो आणि सहज न दिसणार्या गोष्टीही पाहतो, तोच खरा नेता असतो असे ते म्हणाले.
या सोहळ्यात एकूण 1,373 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदवी प्रदान करण्यात आल्या. यात नागपूर आणि अमरावती मध्यवर्ती कारागृह अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या सोहळ्यात अनेकांनी मिळवलेले प्रेरणादायी यशही सर्वांसमोर मांडले गेले. याच निमित्ताने 85 वर्षीय डॉ. दिगंबर अलसी यांनी कला शाखेतील पदव्युत्तर पदवी – विकास अभ्यासक्रम पूर्ण केल्याची गौरवपूर्ण दखल घेतली गेली. यासोबतच चार दिव्यांग विद्यार्थ्यांना , पदव्या प्रदान करण्यात आल्या.
हा कार्यक्रम ज्ञानवाणी एफएम वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला, ज्ञानदर्शनवरही या समारंभाचे प्रसारण केले गेले, तसेच ऑनलाइन माध्यमांवरूनही या समारंभाचे प्रसारण केले गेले.







