

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515))
गंगाखेड(दि.17डिसेंबर):-पोलीस भरती 2025-26 च्या पार्श्वभूमीवर रॉयल अकॅडेमी गंगाखेड पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र अकॅडमीने समाजोपयोगी आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून तरुणांच्या मनात आशेचा नवा किरण निर्माण केला आहे.रॉयल अकॅडमीचे संचालक गणेश नागरगोजे यांनी आपली कन्या श्रीवल्ली हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त “श्रीवल्ली महाराष्ट्र पोलीस बॅच” या विशेष योजनेअंतर्गत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ 244 रुपयांत ग्राउंड होईपर्यंत प्रॅक्टिस करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.या अनोख्या आणि सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे प्रशिक्षणापासून वंचित राहणाऱ्या अनेक होतकरू युवक-युवतींना मोठा दिलासा मिळाला असून, नागरगोजे यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
परळी रोड,मार्केट यार्ड परिसरात कार्यरत असलेली रॉयल अकॅडेमी गंगाखेड पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र गेल्या काही वर्षांपासून पोलीस, सैन्य व विविध प्रशासकीय सेवांचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने मार्गदर्शन, प्रशिक्षण व सराव उपक्रम राबवत आहे. याच सामाजिक जाणीवेतून यंदाही नागरगोजे यांनी आपल्या कन्येच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधत हा स्तुत्य निर्णय घेतला.या विशेष योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या मैदानावर सकाळी 5.30 ते 7.30 तसेच सायंकाळी 4.30 ते 6.00 या वेळेत शारीरिक चाचणी,धावणे,कवायत व अन्य आवश्यक सराव करण्याची संधी देण्यात येणार आहे. कमी शुल्कात दीर्घकाळ प्रशिक्षण मिळाल्याने ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील गरजू विद्यार्थ्यांना काहीतरी देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. अधिकाधिक युवकांनी पोलीस सेवेत दाखल व्हावे, हेच आमचे ध्येय आहे,” अशी भावना गणेश नागरगोजे यांनी व्यक्त केली.या उपक्रमामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नवी दिशा व बळ मिळाले असून, श्रीवल्लीच्या वाढदिवसाने अनेकांच्या आयुष्यात यशाचा नवा प्रारंभ घडवावा, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.







