Home महाराष्ट्र मुंबई महानगर पालिका निवडणूक-जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या अपेक्षा/ मनोगत

मुंबई महानगर पालिका निवडणूक-जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या अपेक्षा/ मनोगत

124

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

विधानसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेस मुंबईत तीन लाख 43 हजार 565 मते पडली. ही 25.8% मते होतात. भाजपला तीन लाख 22 हजार 511 मध्ये पडली. म्हणजे 24.3% मध्ये. तर काँग्रेसला दोन लाख 43 हजार 755 मते. टक्केवारीच्या हिशोबात 18.3%. खोके गटास, म्हणजेच शिंदेसेनेला दोन लाख 29 हजार 606, म्हणजे १८ टक्के मते आणि मनसेला 1 लाख २०  हजार, म्हणजे दहा टक्के मते पडली. 

मुंबईत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु जर काँग्रेसने महापालिका निवडणुका लढवल्या, तर काँग्रेसला फटका बसू शकतो. याचे कारण विधानसभेच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची काँग्रेसला नक्कीच मदत झाली. आणि ठाकरे यांनाही काँग्रेसची मदत झाली. परंतु उद्धव व राज ठाकरे यांच्याकडे जो करिष्मा आहे, तो महाराष्ट्रातील वा मुंबईतील कोणत्याही काँग्रेस नेत्याकडे नाही. वर्षा गायकवाड यांना मतदारसंघाच्या  पलीकडे फारशी ओळख नाही. रवी राजा, कृपाशंकर सिंह, संजय निरूपम, मिलिंद देवरा आज काँग्रेसमध्ये नाहीत. भाई जगताप यांचा मर्यादित प्रभाव आहे. परप्रांतीयांना आकर्षित करून घेईल, असा चेहरा  काँग्रेसकडे नाही. मुंबईतील मराठी लोकांना खेचून घेईल असा तर एकही चेहरा नाही.

काँग्रेसने ठाकरेंपासून फारकत घेतली, तर मुंबईत काँग्रेस आणखी मरतुकडी होईल. भाजपच्या महायुती विरोधी मतांत फाटाफूट होणार आहे, हे नक्की. 

मुंबईमधील मनसेचीही मते कमी नाहीत. दोन्ही ठाकरें बरोबर जाण्यातच काँग्रेसचा फायदा आहे. 2019 मध्ये काँग्रेसने राज ठाकरेंच्या प्रतिमेचा  उपयोग करून घेतला, तेव्हा त्यांचा राज यांच्याबद्दल कोणताही आक्षेप नव्हता. नवी दिल्ली महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवून २०२२मध्ये काँग्रेसने आपले तोंड फोडून घेतले होते. दिल्ली पालिका निवडणुकीत ‘आप’ला 2022 मध्ये 134 जागा मिळाल्या, तर भाजपला १०४ जागा.  काँग्रेसला फक्त नऊ जागा मिळाल्या!

काँग्रेसला आपले तोंड पुन्हा पुन्हा  फोडून घेण्याची गरज का वाटते? जो शक्तिमान असतो, तो आपल्या दंडातील बेटकुळ्या दाखवतो. काडी पैलवानाने पुन्हा पुन्हा तथाकथित स्वबळाचे प्रदर्शन करून, आपली शोभा का करून घ्यावी! मुंबई महापालिकेच्या निवडणुकांत भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व ज्या प्रकारे पूर्ण लक्ष घालते, तसे काँग्रेस श्रेष्ठींचे लक्ष का नाही? अजून किती  वेळा मुस्कटात  बसल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या टाळक्यात प्रकाश पडणार आहे?… बाळासाहेब थोरात, भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई  अशा कोणीतरी दिल्लीस जाऊन श्रेष्ठींना मुंबईतील परिस्थितीची तातडीने माहिती दिली पाहिजे. चेन्नीथलांना मुंबईचे काही पडलेले नाही!  मुंबईत काँग्रेसने भाजपच्या  बी टीमचे काम करू नये!