Home महाराष्ट्र साऱ्या जगाची आई आमची सावित्रीमाई–डॉ.शोभा कदम

साऱ्या जगाची आई आमची सावित्रीमाई–डॉ.शोभा कदम

105

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.5जानेवारी):-येथील डॉ.गारोळे इंटरनॅशनल स्कूल येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात (दिनांक ०३ जानेवारी शनिवार)रोजी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.शोभा कदम उपस्थित होत्या,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालक डॉ. किरण गारोळे यांची उपस्थिती होती

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी संपूर्ण सभागृहात उत्साहाचे व आदराचे वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमात शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी हिंदी व इंग्रजी भाषेतून प्रभावी भाषणे सादर केली. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थिनींनी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा वेष परिधान करून उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी सावित्रीमाईंच्या कार्याची व त्यागाची जाणीव करून दिली.

प्रमुख मार्गदर्शक डॉ.शोभा कदम यांनी आपल्या मार्गदर्शनात सावित्रीमाईंच्या जीवनसंघर्षावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, “सावित्रीमाईंचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय होता. समाजाकडून दगड,शेण,वीटा झेलूनही त्या कधीच मागे हटल्या नाहीत.धर्माच्या ठेकेदारांच्या विरोधात जाऊन,आपल्या पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.आज आपल्याला जे शिक्षणाचे दारे खुली आहेत,ती सावित्रीमाईंच्याच संघर्षामुळे. त्यामुळे त्या केवळ आपल्या समाजाच्या नाही,तर संपूर्ण आधुनिक शिक्षणविश्वाच्या आई आहेत.”

अध्यक्षीय समारोपात डॉ.किरण गारोळे यांनी सावित्रीमाईंच्या कार्याचे महत्त्व विशद केले.त्या म्हणाल्या की, “आज आपण मुक्तपणे शिक्षण घेत आहोत, महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, हे केवळ क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या त्याग,समर्पण,बलिदान आणि अथक परिश्रमांमुळे शक्य झाले आहे.आज कल्पना चावला,सुनीता विल्यम्स यांसारख्या महिलांचे यश हे सावित्रीमाईंच्या विचारांचे फलित आहे. हे आदर्श आपल्या जीवनात आचरणात आणले पाहिजेत.

यावेळी शाळेचे प्राचार्य प्रा.एम.एम. सुरनर यांनी विद्यार्थ्यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देत,आपणही सावित्रीमाईंसारखे समाजासाठी कार्य करणारे बनले पाहिजे,असे मार्गदर्शन केले.उपप्राचार्य जगदीश मंदोडे तसेच इतर शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली मोरे यांनीकेले,तर आभार पूनम लटपटे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेखा पवार,सोनम शेख,सचिन होरे, राजू चव्हाण,राजू कुलकर्णी,दिपाली चोरघडे,तसनीम शेख,गायत्री कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.