Home Breaking News रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे*- *सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक...

रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे*- *सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रद्धा महाजन

128

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 चोपडा(दि.20जानेवारी):- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि मानसशास्त्र विभाग, मानसशास्त्र समुपदेशन केंद्र व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान उपक्रमांतर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात माजी शिक्षणमंत्री कै.अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. 

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ हे उपस्थित होते. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन विभाग जळगाव येथील मोटर वाहन निरीक्षक योगिता अत्तरदे, उपप्रादेशिक परिवहन विभाग जळगावच्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्रद्धा महाजन, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी.सूर्यवंशी, आरटीओ कर्मचारी परेश मराठे, राज मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक प्रवीण पाटील,  डॉ. आर.आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. आर. पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

   यावेळी जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटर वाहन निरीक्षक योगिता अत्तरदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, रस्ते नियमांचे पालन करावे. आपले तसेच इतरांच्याही जीवनाचे रक्षण करण्यासाठी आपण स्वतः वाहतूक नियमांचे पालन करून जनजागृती करावी. 

    यावेळी जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्रद्धा महाजन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,  ‘सुरक्षेसाठी बचावात्मक उपाय करायला हवेत. सुरक्षेसाठी हेल्मेट चा वापर करणे गरजेचे आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. नशेपासून दूर रहावे. सिग्नल वरील लाईटचा अर्थ समजून घ्यावा.वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास रस्त्यावरील अपघात टाळता येऊ शकतील’. यावेळी त्यांनी सिग्नल वरील चिन्हांचा वापर, इमर्जन्सी एक्झिटचा वापर कसा करावा?हेल्मेट कसे वापरावे?याविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.

   याप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शैलेशकुमार वाघ अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘रस्ता सुरक्षा हा मानवी जीवनाचा महत्त्वाचा भाग असून रस्ते अपघातात होणारे मृत्यू एक गंभीर समस्या आहे. अनेक अपघात हे सदोष मानवी चुकांमुळे होतात. आपल्यामुळे दुसऱ्यांचा जीव जाणार नाही, याची काळजी घेण्यासाठी नियमांच्याचे पालन करावे. सुरक्षिततेसाठी जनजागृती प्रबोधन करणे गरजेचे आहे.’ 

       यावेळी रस्ते वाहतूक नियमांच्या संदर्भात अचूक उत्तरे देणाऱ्या मनीष माळी, शरद कुंभार, पूजा पाटील, हर्षल मराठे, सिद्धेश्वर परदेशी या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट देऊन सन्मानित करण्यात आले. 

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. एम. एल. भुसारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वाणिज्य विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.