Home अमरावती कवी मनातील जाणीव जिवंत व प्रवाही असणे आवश्यक-कवी संमेलनाध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले

कवी मनातील जाणीव जिवंत व प्रवाही असणे आवश्यक-कवी संमेलनाध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले

95

▪️” शिक्षक साहित्य संमेलनातील कवीसंमेलन रंगले “

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.20जानेवारी):- ” कवी स्वतःच्या मनात निर्माण होणाऱ्या उद्रेकाला थोपवू शकत नाही.त्या उद्रेकातूनच त्याची कविता आकारास येते,तसाच काव्य हा मनात निर्माण होणारा सहजोद्रेकच असतो. ही 

कवी मनातील जाणीव जिवंत व प्रवाही असावी लागते.त्यातून जे काव्य निर्माण होतं ते अक्षर वाड्मय ठरतं.”असे विचार परिवर्तनवादी अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण 

बाबारावजी बुंदेले यांनी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून व्यक्त केले.

               ते श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय,अमरावती येथील मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी येथे ११ जाने. २०२६ ला संपन्न झालेल्या ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनातील कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.

      करा मतदान’ या अभंगाचे गायन करून लोकशाहीचा जागर करताना

कवीसंमेलनाध्यक्ष अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले अध्यक्षीय अभंगात म्हणतात की,

ध्यानात ठेऊ या । दिन मतदान ।। 

करू या सन्मान । लोकशाही ।।

टाळू नका कोणी । मतदान करा ।।

लोकशाही करा । बळकट ।। .६ ।।

      ‘ रुसवे फुगवे ‘ या कवितेत कवी जयदीप सोनखासकर म्हणतात की,

” सत्ता नेहमी खुर्चीवर रुसते ।

नेता अन् कार्यकर्ता बकाल ॥

मात्र सुंदरी रोज खुणावते । करण्या दुसऱ्याला कंगाल ॥”

            कवीसंमेलनाच्या प्रमुख अतिथी कवयित्री डॉ.अनघा सोमवंशी सोनखासकर मातीचे मोल सांगताना म्हणतात की,

    “माही जमीन जमीन ।

     अन्न देते ती खायला ॥

     तहानलेल्या जीवाला ।

     पाणी देते ती प्यायला ॥

            कवीसंमेलनाच्या प्रमुख अतिथी कवयित्री अंजली वारकरी म्हणतात,

” टॅबलेट, कॅप्सूल,

हाय लय जादूगर ॥

नावं गावं माह्य इसरला,

होठी रायते औषध खंडीभर ॥”

             कवी प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे ‘राजकारन’या कवितेत राजकारणाच वास्तव सांगताना म्हणतात की,

” मजा करते नेते,जनतेचे व्हते मरनं ॥

लयच गंद हाय राजे हो, भारतातलं राजकारन ॥ “

         कवयित्री प्रियंका गिरी म्हणतात की,

” केव्हापासून शोधत आहे ।

घर माझे मी घरात माझ्या ॥

अजूनही सापडले नाही ।

किती गेल्या हयात माझ्या ॥ “

     कवयित्री छाया पाथरे ‘वृक्ष आमचे सोयरे’ या निसर्ग कवितेत म्हणतात की,

“वृक्ष सर्व छाया देती ।

फळे फुले अन्न ही देती ॥

वृक्ष सर्वा पोषण करती ।   

वृक्ष आमचे सोयरे ती ॥ “

        कवयित्री प्रा.सुशीला मळसणे ‘कविता’ या कवितेत म्हणतात की,

“प्रत्येकाने बोलावी कविता । प्रत्येकाने गावी कविता ॥

प्रत्येकाने सोसावी कविता । भावनांच्या तळातून ॥”

              कवयित्री डॉ.मंदा माणिकराव नांदुरकर’ दूरचा डोंगर ‘ या कवितेत रानात आईचे दर्शन कसे घडले हे सांगताना म्हणतात की,

उन्हाच्या मिठीत । शोधते सावली ॥

रानाच्या घरात । मायचं गावली ॥

. कवी कैलास जानराव कापडे ‘ माय ‘ या कवितेत आईच्या कष्टाचं मोल सांगताना म्हणतात की,

“रोज रोज वावरात माय वेचे सरपणं ॥

मायच्या कष्टाले ग इथं नाही मोलपणं ॥”

           कवयित्री डॉ. नेहा विनोद भटकर ‘आयुष्याच्या या

 वळणावर’या कवितेत म्हणतात की ,

“साद घालण्या आकाशीच्या निळाईला ॥

कवेत घ्याया चांदण्यांच्या धवल खळीला ॥”

         कवयित्री सौ.प्रतिक्षा हेमंतगणगणे(होले)

‘भाऊसाहेब’या कवितेत म्हणतात की,

“जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांसाठी सदा आपण झटले ॥

दिल्लीत पहिले कृषी प्रदर्शन घडविले ॥”

      कवी श्याम चौकडे ‘ मग हानु काय टकल्यात ‘ या प्रबोधनपर कवितेत म्हणतात की ,

“जिथ तिथ का? राजा ।

प्लास्टिक पन्नी फेकतो ।

एकदा नाही सांगत ।

दहा वेळा रे सांगतो ।

 मग हानू काय टकल्यात ॥”

       कवयित्री सौ.रंजना कराळे, 

‘ ऋतू शीत हा’ या निसर्ग कवितेत म्हणतात की,

” फूलपाखरू कधी काढते फुलराणीची खोडी ॥

अंगी मखमल लेवुन चाखी स्वर्णफुलांची गोडी ॥”

            कवयित्री डॉ.निर्मला पुंडलिकराव भामोदे ,”भ्रूण कन्येचा टाहो ” या कवितेत स्त्रीभ्रूणाचे मनोगत व्यक्त करताना म्हणतात की,

“मुलगा वंशाचा दिवा तर,

 मुलगी ही आहे पणती ॥

उजळते ती दोन्ही कुळे, 

नसे कर्तृत्वाला गणती ll “

       कवयित्री सौ.आरती नागपुरे ‘ शिक्षकी व्यथा या ‘वास्तववादी कवितेत म्हणतात की,

 ” शिक्षकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह 

अन खुळ्या प्रयोगांचं, वाहू लागल वारं

शिक्षण व्यवस्थेमधील हे नवं 

कुत्रे मोजन्याचं तर, खुळंच न्यार.. 

      तसेच या कवी संमेलनामध्ये चारुदत्त मेहरे, पुष्पा अतकरे , राजेंद्र भटकर, सिम्रेला देशमुख, शीतल राऊत, प्रा.अर्चना पोटे,साहेबराव बांबल, कैलास पवार ,प्रा.डॉ. विना राऊत,सुरेंद्रनाथ वाडेकर ,लीना नाथे ,संदीप देशमुख, गजेंद्र पाथरे,राणी नागपूरे ,विशाल देशमुख,अर्चना गुल्हाने ,प्रदीप घुनागे यांनी आपल्या कवितांचे दमदारपणे सादरीकरण केले.

        या कवीसंमेलनाला संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.गणेश चव्हाण,प्राचार्य डॉ.विनय राऊत राज्याध्यक्ष मा.जयदीप सोनखासकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

            या कवीसंमेलनाचे बहारदार संचलन प्राचार्य डॉ. अतुल ठाकरे व प्रियंका गिरी यांनी केले तर आभार गजेंद्र पाथरे यांनी मानले.कवी संमेलनाला बहुसंख्य रसिक वर्ग उपस्थित होता.