?जिल्हाधिकाऱ्यांनी केली कोरोना नियंत्रण कक्षाची पाहणी
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.9सप्टेंबर):-कोरोना संदर्भात नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच आवश्यक माहिती उपलब्ध व्हावी यासाठी नियंत्रण कक्ष महत्त्वाची भूमिका बजावत आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. कोरोना नियंत्रण कक्षाची पाहणी तसेच नियंत्रण कक्षामार्फत सुरू असलेले कामकाजाबाबत त्यांनी आढावा घेतला.
यावेळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोनाच्या संदर्भात माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी तसेच उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात येणारी आपत्तीजनक परिस्थितीबाबत सतर्कते विषयीची माहिती नागरिकांपर्यंत तात्काळ पोहोचविता येईल असे नियोजन करावे. अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. त्याचबरोबर, कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी समन्वय साधून कामे पूर्ण करावीत असेही ते म्हणाले.
कोरोना नियंत्रण कक्षामध्ये 9 कक्ष असून विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी 24 तास सेवा देत आहेत. जिल्हा आरोग्य अलगीकरण पथक, जिल्हा कोरोना अहवाल व नोंदवह्या पथक, कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाही कृतीदल, संपर्क संवाद व आकस्मिक उपाययोजना व मदत पथक आदी प्रकारची पथके कार्यान्वित आहेत.



