

▪️जुने बिल देणार का नाही?
✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.19ऑक्टोबर):-माध्यमांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींबाबत सातत्याने अन्यायाची भूमिका घेतली जात आहे. सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभाग याला जबाबदार आहे. सरकार आता निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही भूमिका घेत आहे. हा अन्याय थांबवा. माध्यमांना नियमाप्रमाणे जाहिराती द्या. जाहिरातीचे देयके वेळेवर काढा. अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला आहे.
विशेष मोहिमेंतर्गत एका जाहिरातीखेरीज काही समकक्ष दैनिकांना अधिकच्या जाहिरातींचे वितरण करण्यात येत आहे. असे का? बाकी दैनिकांनी काय पाप केले, असा प्रश्न ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने उपस्थित केला आहे. जाहिरात वितरण करताना या विभागाचा आळशीपणा पुढे येत आहे. जर रात्री अकरा वाजता जाहिराती मिळत असतील तर ती जाहिरात पानावर लावून अंक छपाईसाठी द्यायचा कधी, हा प्रश्नही निर्माण होतो.
अनेक जाहिरातीची बिले २०१९ पासून निघालेली नाहीत. म्हणजे २०१९ ते २०२५ पर्यंत अनेक बिलांची देयके तशीच प्रलंबित आहेत. जाहिराती मिळत नाहीत, मिळाल्या तर त्या देताना विलंब केला जातो, दिल्या तर त्याचं बिल चार चार वर्षे थकवले जातात. हा सगळा कारभार छोट्या दैनिकांना, साप्ताहिक, मासिक यांच्या मालक, संपादक, पत्रकार यांना प्रचंड यातना देणारा आहे. हा अन्याय असून, या संदर्भात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत अनेक वेळा सरकार आणि माहिती महासंचालनालय यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्या कार्यालायासमोर उपोषणही करण्यात आले आहे.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या शिष्टमंडळाने राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांची भेट घेतली. या भेटीत श्री. सिंह यांनी हा विषय बजेटशी संबंधित असल्याचे उत्तर दिले. मात्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभाग राज्य सरकारच्या इशारावर चालतोय, हे साप्ताहिकांना जाहिराती न देऊन पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारची दुप्पटी भूमिका सुरु आहे. छोटी माध्यमे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात. त्या माध्यमांच्या जाहिराती बंद करून सरकार काय साध्य करू पाहते, असा सवाल उपस्थित झाला आहे. काही ठराविक दैनिके, साप्ताहिके, मासिके याबाबत ही भेदभावाची भूमिका सरकारने आणि राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाने थांबवली नाही, तर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ला उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला आहे.







